मोठी बातमी : बच्चू कडूंची सिधी बात, म्हणाले, मी ना महायुतीचा, ना महाआघाडीचा, नवनीत राणांनाही प्रहारची ऑफर
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) अमरावती मतदारसंघावर दावा ठोकलाय. आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही, असेही त्यांनी सांगितलेय.
Bacchu Kadu on Amravati Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुका काही महिन्यावर (Lok Sabha 2024) येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्षाने तशी तयारीही सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) अमरावती मतदारसंघावर दावा ठोकलाय. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी अमरावती मतदारसंघावर आमचाच दावा असल्याचे म्हटलेय. आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही, असेही त्यांनी सांगितलेय. त्याशिवाय अमरावतीची जागा (Amravati Lok Sabha constituency) प्रहारला मिळाली पाहिजे, नाहीतर नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी, असेही म्हटलेय.
मी कुणाच्या बाजूने हे कोडं -
आम्ही सध्या कोणाच्याही (महायुती, महाविकास आघाडी) बाजूने नाही. काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही आपली राजकीय भूमिका निश्चित करणार आहोत. मी कुणाच्या बाजूने हे कोडं आहे आणि ते व्यवस्थितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिकडे आम्ही जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले. हो मी राजकीय मोलभाव ( बार्गेनिंग ) करतो आहे आणि ते आम्ही व्यवस्थित करू. लोकसभाऐवजी आम्हाला विधानसभेत जास्त जागा हव्या आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.
अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा, नवनीत राणांनाही ऑफर -
बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्याशिवाय नवनीत राणा यांनाही ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र एबीपी माझाच्या माध्यमातून मी त्यांना ही ऑफर देत आहे.
महायुतीत बिघाडी? बच्चू कडूंना पत्रकार परिषदेचं आमंत्रण नाही-
महायुतीच्या आजच्या एकत्रित प्रेस कॉनस्पेन्स संदर्भात मला माहिती नाही. आजच्या महायुतीच्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल मला निरोप नाही, निमंत्रणही नाही म्हणून मी तिथे उपस्थित नाही, असे बच्चू कडू म्हणाले. कदाचित महायुतीतील पक्षांना मला विश्वासात घ्यावं असं वाटलं नसावं. मला का बोलावलं नाही हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहीत असेल. ते त्यांना विचारलं पाहिजे. मला बोलावलं नाही गोष्टीत मी लक्ष घालत नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितलं.
भाजप राजकीय श्रेय घेणारच, बच्चू कडूंची टीका -
राम मंदिराचं बांधकाम अर्धवट आहे, त्यात देवाची स्थापना करणे योग्य नाही, याबद्दल संजय राऊत यांची काय धार्मिक माहिती आहे मला माहित नाही. मात्र भाजप राजकीय श्रेय घेणारच. भाजपनं त्या संदर्भात पुढाकार घेतलाय, त्यानंतर प्रभू रामचंद्र यांचं मंदिर उभं राहिलं म्हणून ते श्रेय घेणारच.इतर पक्षांनी केलं असतं तर त्यांनी पण श्रेय घेतलं असतं. मात्र हे काही एकट्या भाजपचं श्रेय नाही, अनेक रामभक्तांनी बलिदान दिले आहे, विविध संघटनांनी प्रयत्न केले आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.
राम मंदिराच्या निमंत्रणावरुन काय म्हणाले बच्चू कडू?
मी राम भक्त आहे. राम मंदिर लोकार्पणाच्या निमंत्रणाची मला गरज नाही. राम भक्तांना निमंत्रनाची आवश्यकता वाटावी हे रामभक्तांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांना राम मंदिरासाठी निमंत्रण शिवाय जाऊ नये असं वाटतंय, हा त्यांचा प्रश्न आहे, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेय.