'जरांगे, हाकेंनी सरकारला चॅलेंज देण्यापेक्षा निवडणूक लढवावी, मग कळेल समाज किती संख्येने त्यांच्यासोबत' : बबनराव तायवाडे
Babanrao Taywade : मनोज जरांगे व लक्ष्मण हाके यांनी विधानसभेच्या 288 जागा लढण्याचे चॅलेंज राज्य सरकारला देण्यापेक्षा खरंच निवडणूक लढवावी, असे बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, या मागणीवर ते ठाम आहेत. तसेच आरक्षण मिळाले नाही तर विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढणार असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे वडीगोद्री येथे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. आता मराठा-ओबीसी वादावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा व ओबीसी समाजाच्या नावाने राजकीय आंदोलन : बबनराव तायवाडे
मनोज जरांगे व लक्ष्मण हाके यांनी विधानसभेच्या 288 जागा लढण्याचे चॅलेंज राज्य सरकारला देण्यापेक्षा खरंच निवडणूक लढवावी म्हणजे जरांगे व हाके यांना किती मतं मिळतात व समाज खरंच किती संख्येने त्यांच्या सोबत आहे, हे कळून येईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मागण्या आधीच मान्य झाल्या असताना सध्या राज्यात मराठा व ओबीसी समाजाच्या नावाने आंदोलन सुरु आहे. हे राजकीय आंदोलन झाले असल्याची खंत तायवाडे यांनी व्यक्त केली आहे. 50 टक्के मर्यादा ओलांडताना कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. तसे झाले नाहीतर बिहार सरकारसारखे न्यायालयात तोंडघशी पडावे लागते, असेही तायवाडे म्हणाले.
कर्पुरी ठाकूर फार्मूलाच एकमेव पर्याय : हरिभाऊ राठोड
दरम्यान, ओबीसी नेते हरीभाऊ राठोड यांनी याबाबत म्हटले आहे की, राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद पेटला आहे. यावर राज्य सरकारला तोडगा काढता आलेला नाही. मात्र यावर कर्पुरी ठाकूर फार्मूलाच एकमेव पर्याय असल्याचे आणि तो लागू करणे गरजेचे आहे. शरद पवार यांनी जरी केंद्राला बघ्याची भूमिका घेता येणार नाही असे सांगितलं असले तरी हा प्रश्न राज्य सरकारचा आहे. मराठा निवडणूक लढले तरी महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसेल पण सत्ताधाऱ्यांना जास्त फटका बसेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा