satara news : कौशल्य विकासातील आदर्श नियोजनासाठी 30 जिल्ह्यांना पुरस्कार, महाराष्ट्रातील 'या' पाच जिल्ह्यांचा समावेश
कौशल्य विकासातील आदर्श नियोजनासाठी 30 जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
Satara news : द्वितीय जिल्हा कौशल्य विकास नियोजन (DSDP) पुरस्कारांमध्ये कौशल्य विकासातील आदर्श नियोजनासाठी 30 जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. देशभरातील 700 जिल्ह्यांपैकी 467 जिल्ह्यांनी जिल्हा कौशल्य विकास नियोजन पुरस्कार स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये पुरस्कार मिळालेला 30 जिल्ह्यापैकी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर याठिकाणी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रातील जिल्हे
सातारा - तिसरा क्रमांक
सिंधुदुर्ग - सहावा क्रमांक
वाशिम - 12 वा क्रमांक
ठाणे - 18 वा क्रमांक
सोलापूर - 26 वा क्रमांक
सर्व सहभागी जिल्ह्यांपैकी गुजरातमधील राजकोट, आसाममधील कछार आणि महाराष्ट्रातील सातारा हे जिल्हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर राहिले. 30 राज्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी आणि इतर प्रतिनिधींनी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी आपल्या कल्पना आणि अनुभव मांडले. आपापल्या जिल्ह्यातील तळागाळातील पातळीवरील कौशल्यविकास कामाचे सादरीकरण केले. दुसऱ्या टप्प्यावर तीस जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती.
तीन श्रेणींसाठी मिळाले पुरस्कार
1) जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी 8 पुरस्कार
2) जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी 13 प्रमाणपत्रे
3) जिल्हा कौशल्य विकास नियोजनासाठी 9 प्रशंसापत्रे
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी आणि इतर अधिकार्यांना कुशल कर्मचारीवर्गाचा मागणी आलेख काढण्यास आणि स्थानिक पातळीवर कौशल्य विकास उपक्रमांबद्दल जागरुकता मोहीम सुरू करण्यास सांगितले. कौशल्य ही जीवनभर चालणारी एक निरंतर प्रक्रिया आहे. जिल्हाधकाऱ्यांनी कल्पकतापूर्ण नियोजनाद्वारे कौशल्य विकास परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेने कौशल्य विकासाची संपूर्ण परिसंस्था जिल्हा स्तरावर पुढे नेली पाहिजे तसेच सातत्यपूर्ण कार्य केले पाहिजे, असही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील सातारा इथं, जिल्हा कौशल्य समितीनं कौशल्य बळकट करण्याच्या दृष्टीनं आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले. कोविडच्या काळात प्रभावित झालेल्या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या सबलीकरणाची जबाबदारीही जिल्ह्याने घेतली आहे.