पेट्रोल महागल्यानं पेट्रोल चोरीचा धंदा, कारण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क!
यापूर्वी कांद्याचा दर वाढल्याने कांद्याची चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. आता त्याच धर्तीवर पेट्रोल चोरीची घटना औरंगाबादमध्ये घडलीय. मौजमजेसाठी घेतलेले कर्ज फेडायला पेट्रोलची चोरी करत असल्याचं आरोपींनी मान्य केलंय.
औरंगाबाद: कांद्याचे दर वाढले की कांद्याच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणावर सुरु होतात आणि त्यासंबंधी गुन्हे देखील दाखल होतात .अगदी तसंच काहीसं औरंगाबादमध्ये घडलंय. पेट्रोल महागाईच्या या काळात शहरातील दोन तरुणांनी पेट्रोल चोरीचा धंदा सुरु केला. या पेट्रोल चोरीच्या गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून आरोपी आता गडाआड झाले आहेत.
सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामुळे औरंगाबादेत दोन तरुणांनी रात्रीतून पेट्रोल चोरीचा धंदा सुरू केला .पेट्रोल चोरीतून चांगले पैसे मिळायला लागले आणि पुढे यातूनच त्यांनी मौजमजा करण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं ठरवलं. पण ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोलच्या दरानं नव्वदी पार केली आहे. सामान्य माणसाला पेट्रोल दरवाढीमुळे झळ बसते आहे. पेट्रोल दरवाढीचा फायदा घेण्यासाठी शहरातील काही चोरांनी पेट्रोल चोरीचा नवा धंदा सुरू केला आहे. यामुळे रात्रीतून पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे.
औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील छत्रपतीनगर या परिसरात पुंडलिक नगर पोलिसांची गस्त सुरू होती .रात्रीच्या सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास दोन तरुण पोलिसांना पाहून पळायला लागले. शंका आल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडलं. किरण रामभाऊ दापके (रा.कडा परिसर ) आणि कृष्णा अण्णासाहेब लष्करे (रा. शिवाजीनगर) अशी त्या तरुणांनी आपली नावं सांगितली.
पोलिसानी त्या तरुणांना पकडलं तेव्हा त्यांच्या हातात प्लास्टिकचे कॅन होते. त्यामध्ये 10 ते 12 लिटर पेट्रोल होतं. त्यांची अधिक चौकशी केली असता जे समोर आलं ते ऐकून पोलिस थक्क झाले.
रात्रीतून पेट्रोल चोरी करायचं आणि दिवसा थोड्या कमी दरात विकायचं हा त्या तरुणांचा धंदा होता. याप्रकरणी पोलीस कॉंस्टेबल इमरान यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. संबंधित तरुण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल चोरी करीत असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस हवालदार एल. बी. हिंगे हे अधिक तपास करत आहेत. आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना जामीन मंजुर केलाय.
कर्ज फेडण्यासाठी पेट्रोल चोरी दोन्ही आरोपी 9 वी आणि 12 वीपर्यंत शिकलेले आहेत. ते अधूनमधून मजूरीही करतात. मौजमजा करण्यासाठी त्यांनी मित्रांकडून काही उसने पैसे घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी हे दोघं रात्री पेट्रोलची चोरी करायचे. आता दोघांच्याही हातात बेड्या पडल्या आहेत. पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने आणि चोरीच्या पेट्रोल मधून चांगले पैसे मिळत असल्यानेच हे तरुण या पेट्रोल चोरीच्या धंद्याकडे वळाले हे नक्की आहे. यापूर्वी देखील आपण कांद्याचे दर गगनाला भिडल्याने अनेक क्विंटल कांदा चोरीला गेल्याच्या आणि त्यासंबंधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार झालेल्या घटना ऐकल्या असतील. आता पेट्रोलचे दर वाढल्यानं पेट्रोल चोरीच्या घटना घडल्या आणि गुन्हे दाखल झाले तर नवल वाटायला नको इतकच.
महत्वाच्या बातम्या: