औरंगाबादेत बनावट लसीकरणाचे प्रमाणपत्र देणारी टोळी अटकेत
औरंगाबाद शहर पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने लसीकरणाचे बोगस सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादेत आणखी बनावट लसीकरणाचं प्रमाणपत्र देणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतलीय आहे. एडिटिंगचं सॉफ्टवेअर वापरुन प्रमाणपत्रावरील नाव, आधार क्रमांक,वय बदलल्याचा प्रकार समोर आलाय. पोलिसांनी छापा टाकत बनावट लसीकरणाचं प्रमाणपत्र आणि साहित्य जप्त केलं आहे. शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आरटीओ कार्यालयाच्या बाहेर दोन वेगवेगळ्या ओमिनी गाडीत बसून हे तरुण मूळ प्रमाणपत्रात एडिट करून दोनशे ते सहाशे रुपयात विकत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओ कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या लोकांना लसीकरण सर्टिफिकेट असल्याशिवाय एन्ट्री मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांना हे दोघेही तरुण दोनशे ते सहाशे रुपयात बोगस सर्टिफिकेट बनवून देत होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार पोलिसांना माहित होताच, औरंगाबादच्या क्राईम ब्रँचने धाड टाकत दोघेही तरुणांना ताब्यात घेतला आहे. त्यांच्या ताब्यातून दोन ओमिनी गाड्या,कम्प्युटर, प्रिंटर, बोगस सर्टिफिकेट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर शेख मिनाजउद्दीन शेख अशफाकउद्दीन ( वय 26 वर्ष ) आणि अदनान उल्ला मुजीब बेग ( वय 20 वर्ष ) नावाच्या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे.
असं बनवायचे बोगस सर्टिफिकेट
व्हॅनमध्ये असलेल्या एच.पी कंपनीचा लॅपटॉप असून आरोपी शेख मिनाजउद्दीन हा Google Chrome उघडून त्यावर 'ईजी टु युज ऑन लाईन पीडीएफ इंडिटर' मध्ये जाऊन अपलोड केलेल्या पीडीएफ फाईलमधून मुळ प्रमाणपत्र ओपन करून त्यावर इतर व्यक्तीचा नाव आणि वय आधारकार्ड क्रमांक टाकून मुळ प्रमाणपत्रात बदल करून बनावट प्रमाणपत्र बनवून द्यायचा. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयात जाताना सर्टिफिकेटवरील नंबर टाकून मूळ सर्टिफिकेट कुणाचा आहे हे तपासण्यासाठी कोणतेही यंत्रणाच नसल्याने बोगस सर्टिफिकेट कुणाच्याच लक्षात येत नसे.
दोन दिवसात दोन कारवाई
लस न घेता बोगस सर्टिफिकेट बनवणाऱ्या लोकांवर औरंगाबाद शहर पोलिसांनी दोन दिवसात दोन कारवाया केल्या आहेत. कालच जिन्सी पोलिसांनी बोगस सर्टिफिकेट बनवणाऱ्या शासकीय डॉक्टरांवर कारवाई केली होती. सोबतच या डॉक्टरला मदत करणाऱ्या दोन नर्स आणि इतर काही खाजगी लोकांना सुद्धा ताब्यात घेतले होते. त्यातच आता आज आणखी बोगस लसीकरण तयार करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.