(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापुरात खासगी रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची लेखापरीक्षकांकडून तपासणी, रुग्णांचे वाचवले 87 लाख रुपये
खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलासंदर्भात अनेक जण तक्रारी करत होते. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे सर्व रुग्णालयात लेखा परीक्षकांची नेमणूक करण्यात आली.
सोलापूर : सोलापुरात खासगी रुग्णालयात रुग्णालयांनी दिलेल्या बिलाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आतापर्यंत रुग्णांचे 87 लाख 46 रुपये वाचवले आहेत. सोलापुरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्यानंतर शासकीय रुग्णालयात बेडची संख्या कमी पडू लागली. त्यामुळे शहरातील 25 कोव्हिड हॉस्पीटल आणि कोव्हिड केअर सेंटर अधिग्रहीत करण्यात आली. यापैकी 22 रुग्णालय ही खासगी आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलासंदर्भात अनेक जण तक्रारी करत होते. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे सर्व रुग्णालयात लेखा परीक्षकांची नेमणूक करण्यात आली. सध्या 21 लेखापरीक्षक रुग्णालयांच्या बिलांचे लेखापरीक्षण करत आहेत.
26 जुलै ते 22 सप्टेंबर पर्यंत सोलापूर शहरात खासगी रुग्णालयात जवळपास 1500 रुग्णांनी उपचार घेतले आहेत. खासगी रुग्णालयांनी या रुग्णांना 12 कोटी 70 लाख 363 रुपयांची बिले दिले होती. मात्र लेखा परीक्षकांनी या सर्व बिलांची तपासणी केला असती या मध्ये तफावत आढळली. आतापर्यंत जवळपास 87 लाख 46 रुपयांची तफावत लेखापरीक्षकांनी निदर्शनास आणून दिली. रुग्णालयांनी देखील हे बिल कमी करुन दिल्याने रुग्णांना मोठा दिलासा यामुळे मिळाला असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त तथा कोव्हिड कंट्रोल रुमचे सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी दिली.
शहरातील आश्विनी हॉस्पीटल, सीएनएन हॉस्पीटल, गंगामाई हॉस्पीटल, यशोधरा हॉस्पीटल, सिटी हॉस्पीटल, नर्मदा हॉस्पीटल, बिनित हॉस्पीटल येथे उपचार घेतलेल्या रुग्णांच्या बिलामध्ये ही तफावत होती. रुग्णालयांना लेखापरीक्षकांनी ही तफावत निदर्शनास आणून दिल्यानंतर रुग्णालयांनी देखील बिलात कपात केल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडेनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांची खासगी हॉस्पीटलकडून लूट होऊ नये यासाठी शासनाकडून दर निश्चित करुन देण्यात आले आहेत. कोणत्या बेडसाठी किती रुपये घ्यावे, तसेच कोणत्या तपासण्यांचा या दरात समावेश करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांनी दिलेल्या बिलांमध्ये विशेषत: पीपीई किट, ऑक्सिजन, विविध प्रकराच्या चाचणी यासाठी जादा दर आकरण्यात आले होते. शासनाने लागू केलेल्या दरापेक्षा जास्त दर असल्याने सदरील रक्कम बिलांमधून कपात करण्याच्या सूचना पालिकेच्या लेखापरीक्षकांनी खासगी रुग्णालयांना केली. रुग्णांना बिल देण्याआधी लेखापरीक्षाकांनी बिल तपासणी केल्यामुळे लावण्यात आलेली ज्यादा रक्कम परतफेड करण्यासाठी होणारा त्रास देखील वाचल्याचं उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितलं.
तसेच शासनाने निश्चीत केलेल्या दरांची संपूर्ण माहिती प्रत्येक खासगी हॉस्पीटलच्या बाहेर डिजीटल फ्लेक्सवर आधीच लावण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना स्वत:च बिलांची तपासणी करण्यात मदत होणार आहे. कोणत्याही रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आकरलेल्या बिलासंदर्भात तक्रार असल्यास त्यांनी रुग्णालयात नेमण्यात आलेल्या लेखापरीक्षकाशी किंवा पालिकेच्या कोव्हिड कंट्रोल रुमशी संपर्क करावे असे आवाहन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.
Mumbai Coronavirus | मुंबई महापालिकेचं मिशन मास्क; मास्क न वापरणाऱ्यांना दंड