एकनाथ शिंदेंचा आमदार मंत्री अतुल सावेंच्या दौऱ्याला विरोध करणार, निधीवाटपावरुन महायुतीत तणाव
निधी वाटपावरुन महायुतीमध्ये मोठा तणाव असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांच्या विरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे.

Maharashtra Politicis : निधी वाटपावरुन महायुतीमध्ये मोठा तणाव असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांच्या विरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे. भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Minister Meghna Bordikar) यांनी थेट मंत्री अतुल सावे यांना पत्र लिहीत मंजूर केलेली काम रद्द करण्याची मागणी केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम (MLA Baburao Kadam) यांनी थेट मंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्याला विरोध करत आंदोलन करण्याचा दिला इशारा दिला आहे.
तांडा वस्तीचा निधी मिळावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करुनही अतुल सावे यांनी निधी न देता विरोधी पक्षांच्या नेत्यांना निधी दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतुल सावे यांचा दौरा दिसताच त्याला विरोध करुन आंदोलन करणार असल्याचा इशारा महायुतीतील शिवसेना आमदार बाबूराव कदम यांनी दिला आहे.
तर माझ्या मतदारसंघांमध्ये मी दिलेल्या कामांना कुठलीही मंजुरी न देता इतर कामांना मंजुरी दिली आहे. या कामांना मंजुरी देताना स्थानिक आमदार म्हणून माझी कुठेही शिफारस न घेता इतरांच्या कामांना मंजुरी दिली असा आरोप राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. तसेच काम रद्द करण्यासाठी मंत्री अतुल सावे याना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे नीधी वाटपावरुन मंत्री अतुल सावे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन आतापर्यंत चार महिने झाले आहेत. या चार महिन्यात अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. सुरुवातीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्याने सरकार स्थापन होण्यास विलंब झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती. पण भाजपदेखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने अखेर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. तसेच अजित पवारांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. मात्र, गेल्या ताही दिवसापासून निधी वाटपाच्या मुद्यावरुन महायुतीत धुसफूस असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आक्रमक होत असल्याचीही चर्चा आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम यांनी मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:






















