Ashish Shelar : पेंग्विन सेनेकडून मुंबईला अस्वस्थ करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं, शेलारांची शिवसेनेवर टीका
कोणीही कायदा सुव्यवस्था हाती घेऊ नये, दादरमध्ये नेमकं काय झालं याची मला कल्पना नाही. मी या संदर्भात पूर्ण माहिती घेईल असे वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं.
Ashish Shelar : कोणीही कायदा सुव्यवस्था हाती घेऊ नये, दादरमध्ये नेमकं काय झालं याची मला कल्पना नाही. मी या संदर्भात पूर्ण माहिती घेईल असे वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं. मुंबईला अस्वस्थ करण्याचं काम पेंग्विन सेनेकडून होत असेल तर ते चुकीचे आहे. समाज माध्यमावर पेंग्विन सैनिकांकडून वारंवार चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यांच्याकडून कमरेखाली वार केले जात आहेत, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
स्वतःला वाचवण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न
स्वतःला वाचवण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न केला जात असल्याचे शेलार म्हणाले. तुम्ही म्हणजे मराठी नाहीत असे म्हणत त्यांनी सेनेला टोला लगावला. मी, देवेंद्र फडणवीस आम्ही देखील मराठीच आहोत. आम्हीच म्हणजे मराठी या मूर्खाच्या नंदनवनात पेंग्विन सेना असल्याचे शेलार म्हणाले. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव या काळात मुंबईकरांनी भाजपला सोबत घेऊन हे सण साजरे केले. नवरात्र उत्सवातही भाजपसोबतच मुंबईकर हे सण साजरे करतील असा विश्वास यावेळी शेलारांनी व्यक्त केला. दसरा मेळाव्या संदर्भात देखील आशिष शेलारांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, यासंदर्भात कायदा आपलं काम करेल त्यावर मी बोलणार नाही.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज दादर चौपाटी येथे किनारा स्वच्छ अभियानात सहभाग घेतला. भाजपचे कार्यकर्ते मनी बालन यांच्याकडून या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला
दादरमध्ये नेमकं काय झालं?
शिवसेना आणि शिंदे गटातील धुसफूस (Shivsena Vs Shinde Group) वाढू लागली आहे. मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर आज मध्यरात्री मोठा राडा झाला. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमने-सामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला. यामध्ये विभाग प्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मध्यरात्री सुरू झालेल्या राड्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पडदा पडला. पोलीस चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन बाहेर पडले. राड्याच्या घटनेमुळे प्रभादेवीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.
दरम्यान, प्रभादेवीत मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. मारहाण झालेले शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आमची बाजू ऐकली नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: