Shivsena : प्रभादेवीत राडा: आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केला? पोलिसांकडून तपास सुरू
Shivsena Prabhadevi Rada : शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या आरोपाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
Shivsena Prabhadevi : मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिंदे गटाच्या तक्रारीनंतर दादर पोलिसांनी (Dadar Police) पाच जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आता शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर (Shinde Group MLA Sada Sarvankar) यांनी केलेल्या गोळीबाराच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) आणि एक पोलीस अधिकारी बचावला. तर, सरवणकर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शिंदे गटाच्या संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यासह काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.
शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपात किती तथ्य आहे, याची पोलीस पडताळणी करणार आहेत. आमदार सदा सरवणकर यांच्याकडे परवाना असलेली पिस्तूल असेल तर त्याचे रेकॉर्ड नजीकच्या पोलीस ठाण्यात असणार.
पोलीस हे रेकॉर्ड तपासतील. यामध्ये सरवणकर यांच्याकडे पिस्तुल आणि किती काडतुसे आहेत, याची माहिती नमूद असणार आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार सदा सरवणकर यांच्याकडे तेवढी काडतुसे असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत आहे. त्याशिवाय, या प्रकरणी गोळीबाराच्या आरोपाची सत्यता पडताळण्यासाठी पुरेसे पुरावे तसेच साक्षीदार असणं आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सरवणकर यांनी पहिला गोळीबार प्रभादेवी जंक्शनजवळ केला. तर, दुसरा गोळीबार दादर पोलीस स्टेशनजवळ करण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून गोळीबार प्रकरणातील आरोपांची सगळी चर्चा सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: