आषाढी वारीत दर्शन रांगेतील घुसखोरी बंद होणार, दर्शन रांगेला लावल्या 6 फुटांच्या जाळ्या
आषाढी वारीच्या काळात विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून सात ते आठ किलोमीटर लांब जात असते. या काळात अनेक भाविक ठिकठिकाणी दर्शन रांगेत घुसखोरी करतात. पण ही घुसखोरी आता बंद होणार आहे.

Ashadhi Wari Pandharpur : आषाढी वारीचा (Ashadhi Wari) सोहळा जवळ आला आहे. या वारीसाठी राज्यभरासह देशातील इतर राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. या काळात पंढरपुरात मोठी गर्दी होत असते. या वारीच्या काळात विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून सात ते आठ किलोमीटर लांब जात असते. अशावेळी भाविक 30-30 तास दर्शन रांगेत उभे राहत असतात. पण दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये म्हणून अनेक भाविक ठिकठिकाणी दर्शन रांगेत घुसखोरी करत असतात. पण आता अशा भाविकांना दर्शन रांगेत घुसखोरी करता येणार नाही. कारण दर्शन रांगेला आतासहा फुटांच्या जाळ्या लावल्या आहेत.
आषाढी वारीत वृद्ध लहान मुले महिलांचा मोठा सहभाग
या आषाढी वारीत वृद्ध लहान मुले महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये यासाठी अनेक भाविक ठिकठिकाणी दर्शन रांगेत घुसखोरी करीत असतात. याचा नाहक त्रास वृद्ध भाविकांनी महिलांना सोसावा लागत असतो. आता अशा घुसखोर भाविकांना पायबंध घालण्यासाठी मंदिर समितीने दर्शन रांग ही 6 फूट जाळ्या लावून बंद करण्याचे काम सुरु केल्याने आता अशा भाविकांना रांगेत घुसता येणार नाही.
आषाढी वारीच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी या एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार
दरम्यान, यावर्षी आषाढी वारीच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी या एआय तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) वापर केला जाणार आहे. चैत्री एकादशी दिवशी याची चाचणी देखील पंढरपूर येथील बसस्थानक येथून घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रशिक्षित आय.पी.एस अधिकारी अंजना कृष्णन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, विक्रांत गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, ड्रोन आयडीया फोर्चचे एजीएम आशिष माथूर उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षाकाठी पंढरपुरात जवळपास दोन ते अडीच कोटी भाविक येत असतात. आषाढी यात्राकाळात मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी प्रशासनाकडून एक महिना अगोदरच तयारी केली जाते.
महत्वाच्या बातम्या:


















