Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांना लाठीमार की पोलिसांना ढकलाढकली? आळंदीतील लाठीचार्ज प्रकरणातली दुसरी बाजू मांडणारा व्हिडीओ समोर; नेमकं काय घडलं?
मंदिरामध्ये प्रवेश करण्यावरुन वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाले. मात्र याच प्रकरणाची दुसरी बाजू आता समोर आली आहे. वारकरीच पोलिसांना रेटत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Ashadhi Wari 2023 : आळंदीत पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांना लाठीमार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. मंदिरामध्ये प्रवेश करण्यावरुन वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाले. मात्र याच प्रकरणाची दुसरी बाजू आता समोर आली आहे. वारकरीच पोलिसांना रेटत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कालच्या व्हिडीओवरुन पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा अनेकांनी केला होता मात्र आता दुसऱ्या व्हिडीओत वारकऱ्यांनीच पोलिसांना ढकलल्याचं दिसत आहे.
नेमकं काय घडलं होतं?
या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोप करत आहेत. पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली होती. मात्र याच पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागलं होतं. शेकडो वर्षांत पहिल्यांदाच वारीत असा प्रकार पहिल्यांदाच घडत असल्याचं बोललं गेलं. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला होता. पालखी प्रस्थानादरम्यान मानाच्या पालख्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो. याच मानाच्या दिंंड्या मंदिराच्या जवळ असतात. मात्र ऐनवेळी या दिंंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दिंडीतील इतर वारकरी नाराज झाले. ते मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते. याचवेळी पोलिसांमध्ये आणि दिंडीतील वारकऱ्यांमध्ये वाद झाला होता.
दुसऱ्या व्हिडीओत काय आहे?
काल या प्रकरणाचे तीन व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांकडून वारकऱ्यांंना लाठीमार केल्याचा दावा अनेकांनी केला होता. मात्र त्यानंतर आज पुन्हा याच प्रकरणाचा दुसरा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत मात्र प्रकरणाची दुसरी बाजू स्पष्ट होत आहे. मंदिरात प्रवेश मिळण्यावरुन वाद झाला होता. त्यामुळे वारकऱ्यांनीच पोलिसांना ढकलल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांच्या अंगावर पाय ठेवून वारकरी पुढे सरकत होते. त्यानंतर पोलीस आणि वारकरी आळंदीतील चौकात आले. त्यानंतरचे व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र पोलिसांनी लाठीमार केला नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
शेकडो वर्षांत पहिल्यांदाच वारीला गालबोट...
मागील शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे. कोणतंही विघ्न न येता वारी पार पडली. कोरोनात दोन वर्ष वारीत खंड पडला. मात्र त्यानंतर वारी परंपरेनुसार आणि लाखो वारकऱ्यांच्या गजरात पंढरीला जाते. शेकडो वर्ष ही परंपरा अशीच सुरु आहे. मात्र या वर्षी पहिल्यांदाच वारीला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पेटलं आहे.
पाहा व्हिडीओ...