(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटी मुक्कामी; तर मुक्ताईच्या पालखीचा आष्टी येथे मुक्काम
Ashadhi Wari 2022 : मागच्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच रिंगण सोहळा अनुभवण्याची संधी गावकऱ्यांना मिळाल्याने पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच गर्दी करून या ठिकाणी बसले होते.
Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळाही 13 जूनला झाला. हरिनामाचा गजर करीत पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज सोलापूर येथे मुक्काम
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम सोलापूर या ठिकाणी असणार आहे. दोन दिवस पालखीचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यात होता. उद्या पालखी सोलापूर येथून प्रस्थान करेल तर रात्री पालखीचा मुक्काम तिऱ्हे येथे असणार आहे.
माता रूक्मिणीच्या पालखीचा आज खंडेश्वर मंदिर, खांडवी येथे मुक्काम
माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज रात्री शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथे मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच रविवारी 5 जुलै रोजी ही पालखी सकाळी शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथून प्रस्थान करेल. तर, रात्री श्री. रेणुका विद्यालय, बाभूळगाव, सोलापूर येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
संत मुक्ताईच्या पालखीचा आज आष्टी येथे मुक्काम
यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी आष्टी मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच रविवारी 5 जुलै रोजी ही पालखी रोपळे येथे प्रस्थान करेल, तर उद्या पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे.
संत निवृत्तीनाथ पालखीचा आज कंदर येथे मुक्काम
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज कंदर मुक्कामी असणार आहे. तर, उद्या म्हणजेच 5 जुलै रोजी पालखी सकाळी कंदर येथून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री दगडी अकोले येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे दर्शन पाहता येणार आहे.
संत नामदेवांच्या पालखीचा आज चिंचगाव येथे मुक्काम
दोन वर्षांनंतर पालखीच्या सोहळ्याने अवघी पंढरी पुन्हा एकदा दुमदुमली आहे. भागवत धर्माची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे संत नामदेव महाराज (Sant Namdeo Maharaj) यांची पालखी 19 जून रोजी नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे रवाना झाली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी ही पालखी पंढरपूरला शेकडो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत असते. मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. पालखीचा आजचा मुक्काम चिंचगाव येथे असणार आहे तर, उद्या म्हणजेच 5 जुलै रोजी पालखी चिंचगाव येथून प्रस्थान करेल तर पालखीचा रात्रीचा मुक्काम लहुळ येथे असणार आहे.
संत तुकारामांच्या पालखीचा आज सराटी येथे मुक्काम
विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज सराटी येथे मुक्काम असणार आहे. तर, उद्या पालखी सराटीहून प्रस्थान करेल. तर, पालखीचा रात्रीचा मुक्काम अकलूज येथे असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज नातेपुते येथे मुक्काम
विठूनामाच्या गजरात 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अनेक पालख्या पायी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निगाल्या आहेतत. त्यानुसार पालखीचा आजचा मुक्काम नातेपुते येथे असणार आहे. तर, उद्या पालखी नातेपुते येथून प्रस्थान करेल. तर, रात्रीचा मुक्काम माळशिरस या ठिकाणी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत
- Ashadhi Ekadashi 2022 : आषाढीसाठी 2 वर्षानंतर विठ्ठलाच्या लाडू प्रसादाची विक्री सुरु, लाडू बनविताना भाविकांच्या आरोग्याची ऐशीतैशी
- Ashadhi Ekadashi 2022 : आठवडाभर आधीच विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडमध्ये; यंदा विक्रमी यात्रा भरणार