Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत
Ashadhi Wari 2022 : माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात हरी नामाच्या गजरात आगमन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले पालखीचे स्वागत करण्यात आले.
Ashadhi Wari 2022 : पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरीनामाच्या गजरात आज सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीदिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव,अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11:30 च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.
चला पंढरीसी जाऊं। रखमुमादेविवरा पाहू॥ डोळे निवतील कान। मना तेथे समाधान ॥ संतां महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥ या संत तुकाराम महाराज अभंगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हा प्रवेश झाला. पालखी आगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कलापथकाव्दारे आरोग्यविषयक विविध योजनांची वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले.
वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे म्हणून वेंडरमशीन विसावा ठिकाणी बसविली आहेत. त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारीमध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्तयोगेश देसाई पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यात आला.
कारुंडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Ekadashi 2022 : आषाढीसाठी 2 वर्षानंतर विठ्ठलाच्या लाडू प्रसादाची विक्री सुरु, लाडू बनविताना भाविकांच्या आरोग्याची ऐशीतैशी
- Ashadhi Ekadashi 2022 : आठवडाभर आधीच विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडमध्ये; यंदा विक्रमी यात्रा भरणार
- Ashadhi Wari 2022 : विठ्ठलाचे 24 तास दर्शन, यंदा पंढरपुरात विक्रमी भाविक येण्याची शक्यता