(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महिला वारकऱ्यांना मिळणार आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा, 'आरोग्यवारी' अभियानाचा शुभारंभ
Ashadhi Wari 2022 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'आरोग्यवारी' अभियानाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला त्यामाध्यमातून महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयी सुविधा मिळणार आहेत.
मुंबई: यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनाची जोरदार तयारी सुरू असून त्यामध्ये आता महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या 'आरोग्यवारी' या अभियानाचा पुण्यातून शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुरू करण्यात येणाऱ्या या आरोग्यवारी अभियानामध्ये महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांची सुविधा मिळणार आहे.
आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची संकल्पना असलेल्या 'आरोग्यवारी' या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती. यामध्ये ,
1. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय आणि न्हाणी घराची व्यवस्था असावी.
2. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देण्यात यावे.
3. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
4. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.
अशा सुविधा पुरविण्याबाबत पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनास निर्देश देण्यात आलेले होते. या तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने आरोग्यवारी या संकल्पनेला अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.