संजय राऊतांसाठी शरद पवारांनी मोदींची भेट घेतली पण मलिकांसाठी का नाही? ओवैसींचा सवाल
Asaduddin Owaisi : शिवसेना खासदार संजय राऊतांसाठी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात मग मलिकांसाठी का नाही असा सवाल ओवैसींनी विचारला आहे.
Asaduddin Owaisi Bhiwandi Rally : भिवंडीत आज झालेल्या सभेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला. शिवसेना खासदार संजय राऊतांसाठी पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात मग मलिकांसाठी का नाही असा सवाल ओवैसींनी विचारला आहे. मुघलांवरुन मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही ओवैसींनी केला तसंच ज्ञानवापी आणि ताजमहाल या मुद्द्यांवरुनही ओवैसींनी तोफ डागली. मुस्लिमांची ओळख पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. या सभेत ओवैसींनी महागाईच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारला घेरलं.
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवाब मलिकांपेक्षा जास्त जवळचे
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करू नका असे म्हणतात. त्यांना तुरुंगात टाकू नका अशी विनंती करतात.परंतु मलिकांना तुरुंगाच्या बाहेर का काढले जात नाही, असा प्रश्नही ओवैसी यांनी उपस्थित केला. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवाब मलिकांपेक्षा जास्त जवळचे झाले आहे. हा यांचा खरा चेहरा आहे. मी सत्य समोर ठेवण्याचे काम करतो.
महागाईच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारला घेरलं
ओवैसी म्हणाले, मुस्लीमांना घाबरवले जात आहे. जर हे असेच सुरू राहिले तर लोकशाहीवरील विश्वास उडेल. भारत हा माझा नाही ना मोदींचा आहे. भारत हा द्रविड आदिवासींचा आहे. भाजप दिवस रात्र मुघल-मुघल करत आहेत. सध्या देशात बेरोजगारी मुघलांमुळे आहे का?
आरएसएसवर निशाणा
ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला. आरएसएस हे मुस्लिमांविरोधात आहे. आरएसएस आणि भाजपने जंग-ए-एलान पुकारले आहे. मशिदीवरून होणाऱ्या वादावर ते म्हणाले, बाबरी मशीद आमच्याकडून हिसकावली आहे. आता ज्ञानवापी मशीद देखील हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.कॉंग्रेसने महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती केली आहे.
खालिद गुड्डूविरोधात कट रचला
AIMIM भिवंडी अध्यक्ष खालिद गुड्डू गेल्या काही महिन्यापासून तुरुंगात आहे. खालिद गुड्डूचे राजकीय करिअर संपावण्यासाठी त्याच्या विरोधात कट रचला गेला. खालिद गुड्डू 2007 ते 2019 या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस भिवंडीचे अध्यक्ष होते.
संबंधित बातम्या :