हिंदू शिवसेनेची साथ सोडत असल्याने उद्धव ठाकरेंच्या पायाखालची जमीन सरकली : डॉ.अनिल बोंडे
एमआयएम आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होण्याच्या चर्चेला उधाण आलं असून यावर आता भाजप नेते अनिल बोंडे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अमरावती : एमआयएम आणि महाविकास आघाडी यांच्यात युतीच्या चर्चेवरून सध्या महाराष्ट्रातील राजकारणात बरेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व चर्चा म्हणजे भाजपचं कारस्थान असल्याची टीका केली तसेच त्यांनी शिवसेनेचं हिंदुत्व घराघरात पोहचवा असे भावनिक आवाहन देखील शिवसैनिकांना व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून केले. आता मुख्यमंत्र्यांच्या याच भाषणावरून भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी सडकून टीका केली आहे.
बोंडे म्हणाले, 'हिंदू शिवसेनेची साथ सोडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकते आहे. हे आता निश्चित झाल्यामुळे उद्धवजी पुन्हा हिंदुत्वाचा आलाप आळवीत आहे. खरं तर शिवसेना स्वतंत्र पक्ष राहिलाच नाही. ती शरद पवारांची बी टीम झाली आहे. संजय राऊत खुलेआम कडवट शिवसैनिक म्हणून नाही तर शरद पवारांचे चमचे आहोत याची कबुली देतात. शरद पवारांनी शिवसेनेला फक्त हिंदूंची मतं वळवता यावी म्हणून उपयोग सुरु केला आहे.''
'गोव्यातही शिवसेनेला हिंदूची नापंसती'
पुढे बोलताना बोंडे म्हणाले, ''शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांनी ‘आम्ही म्हणतो ठाकरे सरकार, लाभ घेते पवार सरकार’ म्हणत आहेत. तसंच हिंदूची मत खाण्याकरिता गोवा उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना उतरली परंतु हिंदू जनतेनी त्यांना लाथाडले. नोटाच्या ही खाली मतं दिली.
'राष्ट्रवादीकडून एमआयएमचं स्वागत'
एमआयएमला आमंत्रण दिल्याचं राजेश टोपे आणि सुप्रीया सुळेंनी स्वागत केलं. समविचारी पक्ष एकत्र आले तर चांगले आहे. असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं. सुप्रियाताई आणि एमआयएमचे विचार सारखेच आहेच. दोघांनीही हिजाब घालावा म्हणून राज्यभर आंदोलन केलं. राष्ट्रवादीची महिला आघाडी हिजाबला शाळा कॉलेजमध्ये परवानगी द्यावी म्हणून रस्त्यावर उतरली शिवसेनेच्या संजय राऊतांनी सुध्दा हिजाब घालण्याचे समर्थन केले. त्यामुळे हिंदू शिवसेनेपासून दूर चालले असून उद्धव ठाकरेंना पुन्हा हिंदुत्वाचा उमाळा आला आहे. असा आरोपही बोंडे यांनी यावेळी केला.
संबंधित बातम्या-
- Ramdas Athawale Poem : मविआ-एमआयएम युती प्रकरणावर रामदास आठवलेंची भन्नाट कविता
- 'मविआ-एमआयएम एकत्र आले तरी फरक पडणार नाही, भाजपला हरवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न' : देवेंद्र फडणवीस
- महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवा : इम्तियाज जलील
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha