महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवा : इम्तियाज जलील
AIMIM imtiyaz jaleel offers alliance with Maha Vikas Aghadi : एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे तर दुसरीकडे एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे.
AIMIM imtiyaz jaleel offers alliance with Maha Vikas Aghadi : एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे तर दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी असल्याचं बोललं जातंय.
औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादाचा मुद्दा जलील यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला असता, भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत जलील यांनी व्यक्त केलं. आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत नवी आघाडी करण्याची ऑफर एमआयएमनं दिली. इम्तियाज जलील यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी गेलेल्या मंत्री राजेश टोपे यांची बैठक झाली. यात आपला निरोप पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती जलील यांनी केली.
जलील म्हणाले की, आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे
केवळ राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेस सोबत देखील जायला तयार असल्याचंही इम्तियाज म्हणाले. भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे.त्यामुळे ही बाब राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी गंभीरतेनं घ्यावी. राजेश टोपे यांनी पवार त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवावा. औरंगाबाद महानगरपालिका असं नाही तर राज्यातही युती करायला तयार असल्याचे इम्तियाज यांनी म्हटले आहे. आम्ही कुणालाही नको आहोत. फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत. कशाला राष्ट्रवादी? काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतो. त्यांनाही मुस्लीम मतं हवी आहेत. तर मग यावं काँग्रेसनं, आपण युती करु, असं जलील म्हणाले.
आता एमआयएमची ही ऑफर महाविकास आघाडी स्वीकारणार का? विशेषतः शिवसेना काय भूमिका घेणार याकडे राजकीय पंडितांचं लक्ष असणार आहे.