Amit Thackeray : मराठी भाषा गौरव दिनादिवशी मनसेची मोठी घोषणा, अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी...
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Amit Thackeray : आज मराठी भाषा गौरव दिनादिवशीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी घोषणा केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान,आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.
मनसेमध्ये सध्या तरुण कार्यकर्त्यांचा भरणा होत असल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांचं वत्कृत्व व आक्रमक बाण्याकडं आकर्षित होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील तरुण कार्यकर्त्यांनीही मनसेची वाट धरली होती. या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना केली होती. त्याचं अध्यक्षपद सुरुवातीपासूनच आदित्य शिरोडकर यांच्याकडं होते. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेची विद्यार्थी सेना नेतृत्वहीन झाली होती. विद्यार्थी सेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी व तरुणांना आकर्षित करण्यासाठी आता या विभागाचं नेतृत्व खुद्द अमित ठाकरे यांच्याकडे दिलं जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज मराठी भाषा गौरवदिनादिवशीचं त्यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या काही वर्षांपासून अमित ठाकरे हे मनसेत सक्रिय झाले आहेत. विद्यार्थी व तरुणांचे प्रश्न ते पक्षाच्या माध्यमातून मांडत असतात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी डॉक्टर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडे सरकारचे पत्राद्वारे लक्ष वेधलं होतं. नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले अमित ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड कुतुहल आहे.
दरम्यान, पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना त्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच राज ठाकरे यांनी देखील दौरे, कार्यक्रम सुरू केले आहेत. अशातच आता अमित ठाकरे यांची मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता अमित ठाकरेंच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केलं जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: