एक्स्प्लोर
जनलोकपाल आंदोलनाला आर्थिक चणचण, खात्यात फक्त 18 हजार
खात्यात फक्त 18 हजार रुपये असून अण्णांनी बँकेच्या खात्यात निधी देण्याचं आवाहन केलं आहे.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनलोकपालसाठी दिल्लीत 23 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. मात्र अण्णांच्या आंदोलनाला आर्थिक चणचण भासत आहे. अण्णांनी देशव्यापी मदतीसाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या खात्यात खडखडाट झाला आहे. खात्यात फक्त 18 हजार रुपये असून अण्णांनी बँकेच्या खात्यात निधी देण्याचं आवाहन केलं आहे. अहमनगरमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढल्यात, मात्र सरकारला अदानी आणि अंबानीची काळजी असल्याचा आरोप अण्णांनी केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आणि जनलोकपालच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आर या पार लढाईचा ईशारा अण्णांनी दिला. ''देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे'' ''देशाची वाटचाल सध्या लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरु आहे. कोणतंही बिल संसदेतील चर्चेविना संमत होत असल्याने लोकशाहीला मोठा धोका आहे. सध्या एक-एक पाऊल हुकूमशाहीकडे पडत असून एक दिवस देशात हुकूमशाही येईल'', अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. ''23 मार्चला दिल्लीतील आंदोलनात नाक दाबलं की तोंड उघडणार असल्याचं अण्णांनी म्हटलंय. आंदोलनातून अनेक राजकीय नेते निर्माण झाले, मात्र आता आंदोलनात सहभाग घेणाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र भरुन घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत पाच हजार प्रतिज्ञापत्र मिळाले असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याने 23 मार्चला नाक दाबलं की तोंड उघडेल'', असा ईशारा अण्णांनी दिला आहे. आंदोलनाला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं अण्णांनी सांगितलं. ''अरविंद केजरीवाल, किरण बेदी, व्ही. के. सिंहसह अनेक नेते बाहेर पडल्यावर अनेकांनी गर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. मात्र आता मोठ्या संख्येने तरुण आंदोलनात सहभागी होत आहेत. सध्या 18 जणांची कोअर कमिटी निर्माण करण्यात आलीय. अजूनही संख्या वाढवण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर अनेक समस्यांवर आवाज उठवणार आहे,'' असं अण्णांनी सांगितलं. दिल्लीत पुढच्या आठवड्यात कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती अण्णांनी दिली. ''या सरकारने वित्त विधेयकात राजकीय पक्षांना देणग्या देण्याची मर्यादा वाढवली आहे. एकीकडे सरकार जाहिरात देऊन भ्रष्टाचार कमी करण्याचं आवाहन करतंय, मात्र सरकारने हे भ्रष्टाचाराचं कुराण खुलं केल्याचा आरोप अण्णांनी केला. हा पक्षनिधी कोणाला दिलाय हे पण गुप्त ठेवण्यात आलं आहे. फोर्ब्सच्या यादीत आशियात भारत भ्रष्टाचारात पहिला असल्याचं म्हटलंय. त्यामुळे नाक कापलं गेलं,'' असा आरोप अण्णांनी केला. अरविंद केजरीवालांवर निशाणा आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच अण्णा हजारे यांनीही 'आप'ला धारेवर धरलं आहे. अरविंदने मला देशसेवा करणार असून पक्ष काढणार नसल्याचं म्हटलं होतं. सरकारी गाडी, मानधन आणि बंगला घेणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आता इतर पक्षापेक्षा आपमध्ये जास्त मानधन मिळत असल्याचा आरोप अण्णांनी केला. पक्षाच्या स्थापनेपासून आमचा काहीही सबंध नाही. आश्वासन पूर्ण करण्याची गरज होती. मात्र आज आरोप प्रत्यारोप होत आहेत. आमदारांच्या निलंबन कारवाईची पक्षावर आलेली वेळ दुर्दैवी असून दुःख झाल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा























