संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप करावा,अंजली दमानियांचं मुख्य न्यायमूर्तींनाच पत्र,म्हणाल्या, 'धनंजय मुंडेंच्या चौकशीचे आदेश..'
अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहीत बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपी वाल्मीक कराडचे धनंजय मुंडे यांची हितसंबंध असल्याचा आरोपही केलाय .
Anjali Damania: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे .या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असणाऱ्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला वॉन्टेड म्हणून जाहीर करण्यात आलंय .बीडच्या विशेष न्यायालयात काल वाल्मीक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते . मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मीक कराड सोबत आर्थिक हितसंबंध ठेवल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर होत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलं आहे .संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा .धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी अंजली दमानिया यांनी बुधवारी (22 जानेवारी )उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराध्ये (Alok Aradhye)यांना पत्राद्वारे केली .
अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहीत बीड मधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपी वाल्मीक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांची हितसंबंध असल्याचा आरोपही केलाय .बीडच्या परिस्थितीची दखल घेऊन न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा .वाल्मीक कराड आणि अन्य आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना मुंबईतील कारागृहात ठेवावे .मुंडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या दमानिया यांनी पत्राद्वारे केल्या आहेत .
अंजली दमानिया यांनी पत्रात काय म्हटलं ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा, धनंजय मुंडेवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने द्यावेत असं अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलंय. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपी वाल्मिक कराडचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंशी हितसंबंध असल्याचा पत्रात आरोप करण्यात आलाय. मुंडे हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्यावरील या आरोपांच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे यांना पत्राद्वारे केली. त्या म्हणाल्या,संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अराजकता आणि दहशतीची स्थिती आहे. या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणखी ढासळली असून तेथील नागरिक दहशतीखाली आहेत.एक जागरूक नागरिक म्हणून ही स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे, नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करावा.अशी मागणी दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे, आपल्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करावे अशी मागणी करताना देशमुख हत्या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची आणि तपासाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश तपास यंत्रणेला देण्याची मागणीही दमानिया यांनी केली आहे..
धनंजय मुंडेंची चौकशी करण्याची मागणी
धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षाचे असून यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची निवडणूक आयोगानेही चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना लोकप्रतिनिधी दूर ठेवणे गरजेचे असल्याची मागणी दमानिया यांनी पत्रात केली आहे.तसेच बीडमधील परिस्थितीची दखल घेऊन तेथील स्थिती सुधारण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करून देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी निष्पक्ष होण्यासाठी खटला मुंबईतील न्यायालयात वर्ग करण्यात यावा. वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना मुंबईतील कारागृहात ठेवावे. तसेच, त्यांना व्हिसीमार्फत न्यायालयात हजर करावे. देशमुख हत्येच्या तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवावी.मुंडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. तर वाल्मिक कराड आणि त्यांचे कुटुंबीयांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) देण्याच्यासारख्या मागण्या दमानिया यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.