स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग
आष्टा बसस्थानकातून सांगलीकडे येत असताना त्याने खिडकीजवळून तसेच सीटच्या मधून हात काढून तिला स्पर्श केला. अश्लील चाळे करू लागला. बस सांगली स्थानकात आल्यावर तिने हा प्रकार बसचालकासह प्रवाशांना सांगितला.

सांगली : पुण्यात स्वारगेट स्थानकात शिवशाही मधील मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच शिवशाही बसमध्येच एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केला. आष्टा बसस्थानकातून सांगलीकडे येत असताना त्याने खिडकीजवळून तसेच सीटच्या मधून हात काढून तिला स्पर्श केला. अश्लील चाळे करू लागला. बस सांगली स्थानकात आल्यावर तिने हा प्रकार बसचालकासह प्रवाशांना सांगितला.
आष्टा ते सांगलीदरम्यान मार्गावर घडला प्रकार
हा प्रकार रात्री अकरा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आष्टा ते सांगलीदरम्यान मार्गावर घडला असून याप्रकरणी पीडित तरुणीने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वैभव वसंत कांबळेवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. शिरोळ तालुक्यातील ही 24 वर्षीय तरुणी पुण्यात नोकरीमुळे राहते. तरुणी स्वारगेट ते सांगली शिवशाही बसमधून सांगलीला येत होती. संशयित कांबळे हादेखील बसमध्ये होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत वैभवला ताब्यात घेतले. तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार वैभव कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.
वक्तव्यांवर बंदी घालण्याचा अर्ज फेटाळला
दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या खोट्या, अवमानजनक, असंवेदनशील व दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी, असा पीडितेच्या वकिलांनी केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी फेटाळला आहे. कलम 163 नुसार, जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज पीडितेचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी स्वारगेट एसटी आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडेनं एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. स्वारगेट पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी दत्ता गाडेकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे
12 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत असलेल्या दत्ता गाडेची स्वारगेट बलात्कार प्रकरणात चौकशीत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे समोर आलं आहे. आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली. मात्र, गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे. गाडेचा मुक्कम सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

