(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऐन उन्हाळ्यात शिमल्यासारखी स्थिती, अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Unseasonal Rains : अवकाळीमुळे ऐन मार्च महिन्यात नद्यांना पूर आल्याचं दृश्य दिसंतय तर दुसरीकडे अजिंठा वेरुळ लेणीतील धबधबेही चक्क प्रवाहित झालेत जणू काही पावसाळा सुरु आहे.
Unseasonal Rains : विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन मार्च महिन्यात आलेल्या अवकाळीमुळे मेहनतीने कष्ट करुन पिकवलेल्या सोन्यासारख्या धान्यावर पाणी सोडावं लागतंय की काय अशी भीती निर्माण झालेय..शेतीचं होणाऱ्या अतोनात नुकसानानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय.. केवळ अवकाळी पाऊसच नाही तर मोठ्या प्रमाणात गारपिटीचा वर्षावही होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अवकाळीमुळे ऐन मार्च महिन्यात नद्यांना पूर आल्याचं दृश्य दिसंतय तर दुसरीकडे अजिंठा वेरुळ लेणीतील धबधबेही चक्क प्रवाहित झालेत जणू काही पावसाळा सुरु आहे. नंदूरबार, धुळे, परभणी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झालाय. काही ठिकाणी तर बर्फाची चादर पसरली आहे. यामुळे शिमला, जम्मू काश्मिरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळीमुळे शेतात पिकवायचं काय, कसं आणि कधी हा प्रश्नच शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय..त्यातच कर्मचाऱ्यांच्या संप सुरु असल्यानं नुकसानीचे पंचनामे कधी होणार हा प्रश्नही शेतकऱ्यांना पडलाय..
अकोल्यात काश्मिरसारखे दृष्य
अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. तालूक्यातील आस्टूल, पास्टूल, आगीचे आणि कोठारी गावांत अक्षरश: गारांचा खच पहायला मिळालाय. सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास ही गारपीट झालीय. या गारपिटीनं परिसरातील संत्रा आणि भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतासह गावात गारांच्या चादरीनं अक्षरश: काश्मिरसदृष्य चित्रं पहायला मिळालंय. सलग चार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नंदुरबारमध्ये तुफान गारपीट, डोंगर रांगांवर पांढरी चादर
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा परिसरात झालेल्या गारपिटीमुळे डोंगर रांगांवर बर्फाची पांढरी चादर दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट आणि पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठाणेपाडा परिसरात डोंगर रांगांवर बर्फाचे मोठे खच दिसून येत आहे. या परिसरात जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. डोंगर रांगांवरील बर्फाची चादर आणि रोडच्या बाजूला लागलेला बर्फाचा खच पाहून आपण शिमला येथे आलो की काय अशी स्थिती होईल. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा परिसरातील या ठिकाणी जोरदार गारपिटीमुळे परिसरात बर्फाची चादर पाहण्यास मिळाली. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलात बर्फाचा खच दिसून येत आहे. जवळजवळ सात ते आठ सेंटीमीटर हा खच होता. यामुळे ठाणेपाडा जंगलातील पक्षांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परभणीला अवकाळीचा तडाखा
परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झालाय. यामुळे परभणी तालुक्यातील दैठणा सिंगणापूर, लोहगाव, उमरी, दैठणा, इंदेवाडी, साळापुरी,पोखरणी माळसोना धोंडी आदी गावांच्या परिसरात अवकाळी पाऊस झालाय. महत्त्वाचे म्हणजे जोरदार वारे, मेघगर्जनेसह पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी काढलेली ज्वारी,गहू ,आंबा,मोसंबी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यात 2 दिवसात वीज पडून 3 जण ठार आणि 3 जण जखमी झाले आहेत.
वाशिममध्ये गारपीट
वाशिमच्या पांगरा बंदी गाव परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे गहू, संत्रा पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुरळक प्रमाणात गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने काही प्रमाणात कांद्यासह गहू तर काही प्रमाणात आंबा आणि संत्रा फळभाजी पिकांचं नुकसान झालं आहे.
बीडमध्येही अवकाळी
बीडच्या परळीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं. या पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं. आवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा जरी निर्माण होत असला तरी शेती पिकाच मोठ नुकसान होत आहे. माजलगाव तालुक्यात देखील अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू आणि इतर शेती पिकांच मोठे नुकसान झालं आहे..
नाशकाला अवकाळीचा तडाखा
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. चंदवड, सुरगाणा, कळवण,सिन्नर, निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सुरगाणा, चांदवडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वातावरणात गारवा आला,. मात्र कांदा गहू हरभरा सह इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
नांदेडमध्ये पावसाची हजेरी
नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी अर्धापुर तालुक्यात झालेल्या गारपीटीनंतर आज देगलूरसह बिलोली तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सीमावर्ती भागात असणाऱ्या तंबाखूच्या पिकांचे नुकसान झालेय.
अजिंठा लेणीतील धबधबे ओसंडून वाहिले, वघुर नदीला आला पूर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठीकामी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. तर सोयगाव तालुक्यात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. तर अजिंठा लेणी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः लेणीमधील धबधबे ओसंडून वाहत होते. त्यामुळे लेणी परिसरातील नदीला पूर आल्याचे देखील पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत.
धुळ्यात गारपीट
धुळ्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. साक्री तालुक्यात विविध ठिकाणी गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.