(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tesla Office Pune Details : टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात कुठे अन् किती असेल ऑफिसचं भाडं?
अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्याात सुरु होणार आहे. पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे.
Tesla Office Pune Details : जगप्रसिद्ध टेस्ला कारची निर्मिती करणारी टेस्ला (tesla) कंपनीने भारतात आगमन करायचं ठरवल्यानंतर पहिलं कार्यालय थाटण्यासाठी पुण्याची निवड केली आहे. त्यासाठी पुण्यातील विमान नगर भागातील पंचशील टेक पार्कमध्ये कंपनीने जागा भाड्यानं घ्यायचं ठरवलं आहे. ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला टेस्लाच्या येण्याने प्रगतीच्या आणखी मोठ्या संधी खुल्या होणार आहेत.
किती असेल भाडं?
एलॉन मस्कला ज्या टेस्ला कारने जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनवलं. टेस्ला कंपनी जी अमेरिकन शेअर बाजारातील सर्वात फायदेशीर कंपनी म्हणून ओळखली गेली. ती टेस्ला कार आता भारतात येत आहे. भारतात इलेक्ट्रिक कारचं उत्पादन सुरु करण्याची तयारी करणाऱ्या टेस्लाने कार्यालयीन कामकाजासाठी पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे. इथल्या पहिल्या मजल्यावरील 5 हजार 800 स्क्वेअर फूट जागा टेस्ला कंपनीनं तीन वर्षांसाठी भाड्यानं घेतली आहे. याचं मासिक भाडं 11.65 लाख रुपये असणार आहे.
अनेक मॉडेल यशस्वी...
टेस्ला मोटर्सची स्थापना 2003 साली मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनींग यांनी केली. मात्र कंपनीची घोडदौड खऱ्या अर्थानं एलॉन मस्कने कंपनीची सूत्रं हाती घेतल्यानंतर 2008 साली झाली. कंपनीने 2008 साली स्पोर्ट्स स्टार हे मॉडेल बाजारात आणलं 2012 साली बाजारात दाखल झालेल्या मॉडेल एसने टेस्लाचा खऱ्या अर्थाने दबदबा निर्माण झाला. त्यानंतर एकामागोमाग एक टेस्लाची मॉडेल यशस्वी होत गेली.
कंपनीने सर्व जगभरात इलेक्ट्रिक कारची विक्री सुरु केली. तर अमेरिके बाहेर पहिला कारखाना चीनमध्ये 2019ला सुरु केला. या काळात कंपनीची प्रगती आणि सी ई ओ असलेल्या एलॉन मस्कची संपत्ती सुपर सोनिक वेगाने वाढली. आज जगभरातील इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत टेस्लाचा वाटा 18 टक्क्यांचा आहे. मात्र याच काळात टेस्ला पुढे चीनच्या BYD या कंपनीचं आव्हानही उभं ठाकलं. चीनच्या या कंपनीने 2022ला इलेक्ट्रिक व्हेइकलच्या विक्रीत पहिल्यांदाच टेस्लाला मागे टाकलं. त्यानंतर टेस्लाने भारतीय बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय घेतला .
भारतात सध्या अनेक इलेक्ट्रिक कारचे मॉडेल्स रस्त्यावर धावताना दिसतात. पण टेस्लाचे आगमन झाल्यानंतर इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेचीच नाही तर एकूण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची गणितं बदलून जाणार आहेत. कारचं उत्पादन टेस्ला कुठं करणार? हे अजून स्पष्ट नसलं तरी पुण्याजवळ चाकण किंवा रांजणगाव एमआय डीसी सारखे पर्याय कंपनीला उपलब्ध आहेत. 2022साली टेस्लाने 13 लाख इलेक्ट्रिक कारची निर्मिती करून त्यांची जगभरात विक्री केली आहे. 2030 पर्यंत हे उत्पादन वाढवून दोन कोटी इलेक्ट्रिक कारपर्यंत नेण्याचा एलॉन मास्क यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारतीय बाजारपेठ त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
इलेक्ट्रिक व्हेहिकल्स आणि रिचार्जेबल बॅटरी हे ऊर्जा क्षेत्राचं भवितव्य आहे. हे ओळखून एलॉन मस्कनी त्यामध्ये गुंतवणूक केली आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. हेच नशीब घेऊन टेस्ला भारतात दाखल होत आहे. टेस्लाच्या येण्यानं अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डच्या कार जिथं तयार होतात त्या पुण्याच्याऑटोमोबाईल हबचा आणखी विस्तार होणार आहे. एक मोठी संधी यानिमित्ताने पुण्याच्या उद्योगविश्वात दाखल होत आहे.