Raju Shetti : सातबारा कोरा करा, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी करू; राजू शेट्टी यांचा सरकारला थेट इशारा!
Raju Shetti : सरकारच्या धोरणामुळे आज शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीये. म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
![Raju Shetti : सातबारा कोरा करा, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी करू; राजू शेट्टी यांचा सरकारला थेट इशारा! Raju Shetti announced Vasantrao Naik Debt Relief Movement along with warning to the government maharashtra politics marathi news Raju Shetti : सातबारा कोरा करा, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी करू; राजू शेट्टी यांचा सरकारला थेट इशारा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/1d262be531d7db82d7f672cec45811691719836958117892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Washim News वाशिम: हरित क्रांतीच्या माध्यमातून देशाला अन्नधान्यात समृद्ध करणाऱ्या दिवंगत वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्याच राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणं हे देशासाठी लांच्छनास्पद आहे. सरकारच्या धोरणामुळे आज शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीये. म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली असून यासाठी त्यांनी वाशिम जिल्ह्यातून दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा केलीये. या आंदोलना अंतर्गत पहिल्या टप्प्यात सर्व शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन राष्ट्रपतींना दिले जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी
दिवंगत वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरितक्रांती करून महाराष्ट्राला कृषीप्रधान राज्य बनवले. मात्र त्याच देशामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, हे लांछनास्पद आहे. महिन्याला जवळपास 240 शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठं कर्ज आहे. म्हणून या कर्जाची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा. यासाठी स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात आज पासून सुरू केल्याची घोषणाही राजू शेट्टी यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही राष्ट्रपतींच्या नावे प्रत्येक शेतकऱ्याचे एक निवेदन संकलित करणार आहोत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांना गावबंदी केली जाईल. असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यांमध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन राज्यभरात केले जाईल असेही ते म्हणाले आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे. या निमित्त आज राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वसंतराव नाईक यांच्या जन्म गाव गहुली इथं जाऊन वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आज पासून कर्जमुक्ती अभियान यात्रेला सुरवात केलीय. त्यावेळी ते बोलत होते.
कोणाचे पाय चाटून राजकारण करायचं नाही
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना भाजप कडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावर भाष्य करताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की, कोणाला उमेदवारी दिली आणि कोणाला नाही दिली याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. त्यामुळं कुणाचे पाय चाटून आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही आमच्या मेहनतीवर लढून राजकारण करायचं म्हणून आम्ही स्वबळावर लढलो आणि लढणार आहोत. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)