Ranveer Allahbadia Statment | रणबीर अलाहबादियाचा आधी विकृत कारनामा, मग माफीनामा Special Report
ज्यांना इन्फ्लुएन्सर म्हणून लोक डोक्यावर घेतात, त्यापैकी काहींच्या डोक्यात किती चिखल भरलेला असू शकतो, याची प्रचिती आज सर्वांना आली. आपल्या पॉडकास्टमुळे लोकप्रिय झालेला यूट्यूबर रणबीर अलाहबादिया एका कार्यक्रमात इतकं अश्लिल बरळला की देशभरात संतापाची लाट उसळली. विनोदाच्या नावाखाली सुरु असलेल्या विकृतीचा मुद्दा यानिमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पाहूया, याबाबतचा सविस्तर रिपोर्ट.
परस्त्रीला मातेसमान मानण्याचा शिवछत्रपतींचा वारसा सांगणारा महाराष्ट्र…
जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत मातृत्वाच्या थोरवीचा इतिहास जपणारा महाराष्ट्र..
हा महाराष्ट्र एका यूट्यूबरच्या वाह्यात आणि बाष्कळ वक्तव्यानं चांगलाच संतापलाय.
रणबीर अलाहबादिया नावाचा तथाकथित प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला यूट्यूबर त्याच्या एका वक्तव्यानं टीका, संताप आणि निषेधाच्या गाळात रुतला गेलाय.
निमित्त ठरलं इंडियाज गॉट लेटेंट नावाच्या एका कार्यक्रमाचं…
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला रणबीरनं एक प्रश्न विचारला.
त्या प्रश्नाचा तपशील इतका आक्षेपार्ह की त्याचा उल्लेख करणंही लज्जास्पद वाटावं..
रणबीरनं विचारलेला हा प्रश्न बघताबघता व्हायरल झाला आणि सर्व स्तरातून याचा निषेध व्हायला सुरुवात झाली.
कॉमेडीच्या नावाखाली सुरु असणारे हे विकृत कार्यक्रम खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
विकृत वक्तव्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यातला फरकही त्यांनी समजावून सांगितला.
((प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र त्या अभिव्यक्तीलाही मर्यादा आहेत. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होत असेल, तर ते योग्य नाही. अश्लिलतेबाबतही काही नियम आहेत, मर्यादा आहेत. त्याचं उल्लंघन झालं असेल तर कारवाई होईल.))
महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांना हा प्रकार संतापजनक वाटलाच..
मात्र याच रणबीरचे फॉलोअर्स असणाऱ्या लाखो प्रेक्षकांच्याही हा प्रकार डोक्यात गेला.
वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलेब्रिटींच्या पॉडकास्टमधून मिळवलेली लोकप्रियता एका विकृत वक्तव्यामुळे कशी मातीमोल ठरू शकते, हे यानिमित्तानं दिसून आलं.
रणबीरच्या तब्बल २० लाख फॉलोअर्सनी त्याला काही मिनिटांत अनफॉलो करून टाकलं.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरवण्यात आलेला रणवीर हा कोट्यवधी भारतीयांच्या शिव्याशापांचा धनी ठरला.
त्यानंतर रणबीरनंही आपल्याला उपरती झाल्याचा दावा करत बिनशर्थ माफीनामा सादर केला.
महाराष्ट्राला विनोदाचं वावडं कधीच नव्हतं.
शेकडो वर्षांच्या विनोदी साहित्याची, नाटकांची, सिनेमांची आणि पुस्तकांची पारायणं करत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या.
मात्र विनोदाच्या नावाखाली चालणारी विकृती ठेचण्याचं कामही महाराष्ट्रानं वेळोवेळी केलंय.
या वक्तव्यावर रणबीरनं तर माफी मागितलीय..
मात्र केवळ माफीवर हे प्रकरण संपणार की या विकृत चुकीची शिक्षा त्याला मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
All Shows

































