''बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा''; राज ठाकरे रोखठोक
बदलापूरच्या घटनेवरुन राजकारण चांगलंच तापलं असून या घटनेचं राजकारण करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सध्या बोलबाला असून सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करुन याची जाहिरातबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे, गावागावात ही योजना पोहोचली असून तब्बल 1 कोटी 7 लाख महिला भगिनींना या योजनेचा 3000 रुपये हफ्ता मिळाला आहे. त्यामुळे, राज्य सरकार महिलांसाठी खूप काही करत असल्याचं सांगण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मात्र, दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन विरोधक आक्रमक बनले आहेत. आता, बदलापूर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लाडक्या बहीण योजनेचा संदर्भ देत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा, अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
बदलापूरच्या घटनेवरुन राजकारण चांगलंच तापलं असून या घटनेचं राजकारण करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. आंदोलनावेळी लाडकी बहीण योजनेला उद्देशन बॅनरबाजी कशी करण्यात आली, असा सवालही सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. तर, लाडकी बहीण योजना नको, सुरक्षीत बहीण योजना आणा अशा आशयाचे बॅनर आंदोलनात झळकले होते. त्यामुळे, आंदोलक महिलांनी देखील राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे म्हटले. आता, राज ठाकरे यांनीही लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम आणि ब्रँडिंगसाठी सरकारकडून सुरू असलेल्या उधळपट्टीवर निशाणा साधला आहे.
स्वत:चं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित हवी
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय, याचा मला अभिमान आहे. पण, मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असेही राज यांनी ट्विटरवरुन लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून आज ते गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. दरम्यान, बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन संतप्त शब्दात राज ठाकरे यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं आहे.