(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शरद पवारांचं महत्वाचं वक्तव्य, एकनाथ शिंदेंनाही दिला सल्ला
Sharad Pawar : धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही.
Sharad Pawar on Shiv Sena Dhanushyaban : शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? याची लढाई सध्या कोर्टात आणि निवडणूक आयोगापुढे सुरु आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आहेत. पक्षाच्या चिन्हाबाबतची लढाई कोर्टात असली तरी राजकीय परिघातही त्याची चर्चा जोरात सुरु आहे. धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा वारसा पुढे नेहणाऱ्यांना मिळावं, असं म्हणत भाजप एकनाथ शिंदेंना सपोर्ट करत असल्याचं अनेकदा समोर आले. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्याबाबत सल्ला दिला आहे.
शरद पवार म्हणाले की, धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे किंवा इतरांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात. ते चिन्ह करू शकतात. माझे काँग्रेससोबत मतभेद झाले तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. घड्याळ हे वेगळे चिन्ह घेतले. आम्ही त्यांचे चिन्ह मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. पण काही ना काही तरी करून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत.
भाजप मित्रपक्षांना संपवतो?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. नितीश कुमार यांची तक्रार आहे की, भाजप सोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष त्यांनी जवळपास संपुष्टात आणला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भारतीय जनता पार्टीने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एकप्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते. नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे, असे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्राप्रमाणे बिहारमधील स्थिती-
मागील निवडणुकीत नितिश कुमार आणि भाजप एकत्र लढले. परंतु भाजपचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की ते निवडणुकीत एकत्र येतात आणि मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील याची काळजी घेतात. हे महाराष्ट्रातही घडले. असेच चित्र बिहारमध्येही दिसायला लागले. बिहारचे मुख्यमंत्री वेळीच सावध झाले आणि भाजपपासून दूर होण्याची भूमिका त्यांनी घेतली. आज भाजपचे नेते त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करत आहेत पण नितिश कुमार यांनी टाकलेले पाऊल अत्यंत शहाणपणाचे आहे. उद्या जे संकट भाजप त्यांच्यावर आणणार आहे त्याची वेळीच नोंद घेऊन त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी राज्याच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला, असे शरद पवार म्हणाले.
हर घर तिरंगाबाबत काय म्हणाले शरद पवार?
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक राष्ट्रीय समिती बनली असून त्याचा मीदेखील सभासद आहे. या समितीच्या बैठकीत हर घर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकविण्यात कोणालाही अभिमान वाटेल. हा पक्षीय प्रश्न नाही. हा राष्ट्राचा ध्वज आहे. त्याचा सन्मान या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने करायच्या कल्पनेला आमची साथ आहे.