(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित पवार अजूनही कोरोना पॉझिटिव्ह; बहुमत चाचणीला खबरदारी घेऊन उपस्थित राहणार
Ajit Pawar Still Corona Positive : राज्यात सत्तानाट्य सुरु असतानाच महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. अजुनही ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
Ajit Pawar Still Corona Positive : राज्यात सत्तानाट्य सुरु असतानाच महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाली होती. पण, अजुनही कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. अशातच काल (शुक्रवारी) पुन्हा अजित पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. पण त्यांचा अहवाल अद्याप पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील सत्तासंघर्षामध्ये महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अशातच 3 आणि 4 जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यासाठीच अजित पवारांनी आपली कोरोना चाचणी केली होती. अशातच अजित पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. खबरदारी घेऊन ते फ्लोअर टेस्टमधे सहभागी होणार असल्याच सांगितलं जातंय.
एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. वारंवार आवाहन केल्यानंतर शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र राजकीय हालचालींनी वेग घेतला. उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आणि राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. लगेच दुसऱ्याच दिवशी राज्यात दुसरं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. पण शपथविधीवेळी फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. पण येत्या अधिवेशनात नवनिर्वाचित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले तीन दिवस गोव्यात मुक्कामाला असलेल्या 50 समर्थक आमदारांना घेऊन आज दुपारनंतर मुंबईत येणार आहेत. मात्र निघण्यापूर्वी शिंदे गटाची हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. उद्यापासून विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी शिंदे समर्थक आमदार मुंबईत पोहोचतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल बैठका आटोपल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता गोव्याकडे निघाले आणि पहाटे 4 वाजता पणजीत पोहोचले. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या आमदारांसोबत गोव्यात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री गोवा गाठलं होतं. काल दुपारनंतर ते मुंबईत परतले. संध्याकाळी बैठका आटोपून ते पुन्हा गोव्याला रवाना झाले.
दरम्यान, विधानसभा अधिवेशन 3 आणि 4 जुलैला पार पडणार आहे. नव्या सरकारची बहुमत चाचणी 3 जुलैला होणार आहे. याच दिवशी नवनिर्वाचित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.