वाघिणीकडून पाडसाची शिकार, पेंच अभयारण्यातील शिकारीचा थरारक व्हिडीओ पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद
Nagpur Pench Tiger Reserve | पेंच अभयारण्यातील वाघीण जंगलातील हरणाच्या पाडसाची शिकार करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. पेंच व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडीओ पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
नागपूर: अभयारण्यात वाघाचं दर्शन व्हावं म्हणून पर्यटक तासनतास जंगलात वाट पाहत असतात. पण नुसतंच वाघाचं दर्शन नव्हे तर त्यानं तुमच्या डोळ्यासमोर हरणाच्या पाडसाची शिकार केली तर ती पर्वणीच असेल. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचं दर्शन घ्यायला गेलेल्या पर्यटकाला ही संधी उपलब्ध झाली. एक वाघीण हरणाच्या पाडसाची शिकार करत असतानाचा एक व्हिडीओ या पर्यटकांनी शूट केला आहे.
हे पर्यटक पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली गेटमधून आत गेले होते. काही अंतरावर गेल्यानंतर जिप्सीच्या गाईडने तिथं वाघीण असल्याचं पर्यटकांना सांगितलं. घाटमारा नावाची ही वाघीण पेंच प्रकल्पातील या परिसरात फिरत असते. वन्य कर्मचाऱ्यांना त्या वेळी शिकार होऊ शकते असं लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी पर्यटकांची गाडी थांबली. या ठिकाणी सातत्यानं हरणांचे कॉलिंग होत असल्यानं आजूबाजूला वाघीण असल्याचं वन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आणि काही वेळातच शिकार होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून वर्तवण्यात आली. थोड्याच वेळात त्या वाघिणीने हरणाच्या पाडसाची शिकार केली. पर्यटकांनी शिकारीचा हा व्हीडिओ शूट केला आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. घाटमारा वाघिणीला हरणांचा कॉल (आवाज) ऐकू आल्यानंतर ती सावध होऊन चारही दिशेने पाहू लागली. तेवढ्यात तिला गवतामध्ये हरणाचे पाडस पळताना दिसले. थोडा वेळ आपलं जणू काही लक्षच नसल्याचं दाखवत घाटमारा वाघिणीने अगदी विद्युत वेगानं आपल्या शिकारीवर झडप टाकली आणि क्षणात पाडसाची शिकार केली. शिकार केल्यानंतर वाघीण लागोलाग निघून गेली.
गेल्या काही महिन्यांपासून नागपूर नजीकच्या पेंचच्या जंगलात व्याघ्रदर्शन हमखास होत असल्यानं पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पहा व्हिडीओ: Nagpur Pench Tiger Reserve | पेंच अभयारण्यातील शिकारीचा थरारक व्हिडीओ
संबंधित बातम्या: