Maratha Reservation Jalna : जालना जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल; 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी
Maratha Reservation : सर्वाधिक 2 हजार 375 गुन्हे जालना तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, जालना जिल्ह्यात आणि शहरात देखील मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलनकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तर आतापर्यंत जालना जिल्ह्यात 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकरी आणि पोलिसांत राडा झाला. दुसऱ्या दिवशी जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात जाळपोळ आणि दगडफेक झाली. दरम्यान यावेळी पोलिसांनी 12 बोअर रायफलमधून हवेत गोळीबार केला. तसेच, यावेळी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील करण्यात आला. दरम्यान, मागील तीन चार दिवसांत झालेल्या या सर्व घटनांनंतर पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, गोंदी पोलीस ठाण्यात 418, तालुका ठाण्यात 2 हजार 375 , बदनापूर 260 आणि कदीम ठाण्यात 64 असे एकूण 3 हजार 181 जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशाप्रकारे दाखल करण्यात आले गुन्हे...
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ-मोठाले दगड, लाकडे टाकून, वाहनांची जाळपोळ करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कलम 353, 332, 336, 337, 341, 435, 144, 143, 145, 146, 147, 148, 149, 109, 114 भादंविसह कलम 135 मु. पो. कायदा, सहकलम -3 व 4 सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम 7 क्रिमिनल लॉ अमेन्टमेन्ट अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता...
अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकरी आणि पोलिसांत झालेल्या वादानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. तर, जालना जिल्ह्यात देखील मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला, तर काही ठिकाणी टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. तसेच पोलीस देखील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच कोणेही अफवा पसरवण्याचे काम करू नयेत असे आवाहन देखील जालना पोलिसांनी केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :