(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Weather : मुंबईकरांची थंडीची प्रतीक्षा कायम! आज महाराष्ट्रातील हवामान कसं असेल?
IMD Weather News : दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून उत्तर कोकण आणि गोवा किमानपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. आग्नेय दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबई आणि परिसरात तापमानात जास्त घट होणार नाही.
Maharashtra Weather Update : देशभरात काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तामिळनाडू, केरळ, किनारी कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण, महाराष्ट्रात मात्र आज कोरडं आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. ईशान्य मान्सून आता दक्षिण द्वीपकल्पासाठी कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मुंबईकरांना थंडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. मुंबईसह महाराष्ट्रात या आठवड्यात तापमानात जास्त बदल होण्याची शक्यता नाही.
आज राज्याचं हवामान कसं असेल?
दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून उत्तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात आग्नेय दिशेकडून वारे वाहतील. हे वारे उबदार असतील आणि त्यामुळे तापमानात जास्त घट होणार नाही. 18 ते 20 डिसेंबर दरम्यान, वाऱ्याची दिशा थोडी बदलण्याची शक्यता आहे. पण, शक्यतो महाराष्ट्राच्या हवामानात जास्त बदल होण्यार नसून तापमान कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट
यंदाच्या लांबलेल्या हिवाळ्याला आता कुठे सुरुवात आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. काही भागात तापमान शून्याच्या खाली घसरलं आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक सर्वत्र परसलेली बर्फाची चादर आणि गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहे. काश्मीर खोऱ्यात सध्या हाडे गोठवणारी थंडी आहे.
केरळसह दक्षिणेकडे पावसाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, केरळ (Karala) आणि माहेमध्ये पुढील दोन दिवसांत गडगडाटी वादळी वारे, विजांचा कडकडाट यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, सिक्कीममध्ये (Sikkim) आज गारपीट होण्याची शक्यता आहे, तर अरुणाचल प्रदेशमध्येही आज 13 डिसेंबर रोजी हिच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज तामिळनाडू (Tamil Nadu), पुडुचेरी (Puducherry), कराईकल (karaikal), केरळ (Karala), लक्षद्वीपमध्ये (Lakshadweep) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD चेन्नईने दिलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबरपर्यंत तामिळनाडू आणि पुद्दुचेरी आणि कराईकल परिसरात काही ठिकाणी गडगडाटी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.