Maharashtra Political Crisis : 'नाव शिंदेंचं, पण खरं षडयंत्र भाजपचं', शिवसेना नेते नितीन देशमुख यांचा दावा
Nitin Deshmukh : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे.
Nitin Deshmukh : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांना सामील होत आहेत. मात्र, त्याचवेळी पहिल्या दिवसपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख माघारी परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेला प्रसंग सांगितला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांना परत येण्याचं आवाहन केले. नितीन देशमुख घरी परतल्यानंतर अकोला आणि अमरावतीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ईडीच्या भितीने सर्व आमदार गेले आहेत. या बंडखोरीमागे नाव एकनाथ शिंदे यांचं आहे, पण हे षडयंत्र भाजपचं आहे, असा दावाही नितीन देशमुख यांनी केला.
काय म्हणाले नितीन देशमुख -
गटनेत्यांनी बैठक बोलावली म्हणून मी आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह एकनाथ शिंदेंकडे गेलो. आम्हाला माहित नसताना गुजरातकडे नेलं जात होतं. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील पळालेत. गुजरातच्या हॉटेलला छावणीचं रुप आले होते. 250 ते 300 पोलिसांचा ताफा होता. त्यात आयपीएस अधिकारीही होते. हॉटेलमध्ये भाजपचे नेते होते. मोहित कंबोज, आमदार संजय कुटे होते. भाजपनं एकनाथ शिंदेंना हाताशी धरून षडयंत्र रचल्याची कल्पना आली. पोलिसांसोबत वाद झाले. मी तेथून पळ काढला. आपल्याला पळ काढल्यानंतर एका गाडीत टाकण्यात आलंय. मला काहीच झालेलं नसताना गाडीत टाकण्यात आलंय. दवाखान्यात डॉक्टरनं अटॅक आलेला नसतांनाही तसं सांगण्यात आलं.
जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन दंडात इंजेक्शन टोचलं
याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, "माझी तब्येत टकाटक आहे. तुमच्यासमोर मी चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या तब्येतीत उभा आहे. हॉटेलमधून 12 वाजता निघालो. तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. पण 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कोणत्याही वाहनात मला बसू दिलं जात नव्हतं. तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणतं होतं काय होतं मला माहित नाही. माझ्या शरीरावर चुकीचे उपचार करण्याचं षडयंत्र करायचं होतं. मला काही झाले नसताना इंजिक्शन देऊन घातपात करण्याचं षडयंत्र होते.