Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिवसेनेचा हवा की नको? उद्धव ठाकरेंचा बंडखोर आमदारांना अप्रत्यक्ष सवाल
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत जाण्याची तयारी केली आहे, त्यांना आता मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला आहे.
मुंबई: मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, पण शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धवलेल्या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी आणि बंडखोर आमदारांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्री शिवसेनेचा हवा आहे की नको? हा प्रश्न अप्रत्यक्षपणे शिंदे गटापुढे उद्धव ठाकरेंनी ठेवला आहे.
मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार.. पण शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्या आधी एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचं सांगत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते. पण भाजसोबत गेल्यानंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार का याबद्दल काही स्पष्टता नव्हती, नव्हे ते भाजप देणंही शक्य नाही असंच दिसतंय.
नेमका हाच धागा आज उद्धव ठाकरे यांनी पकडला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला विचारला आहे. आता त्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबुरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन."
पक्षप्रमुख म्हणून मी राजीनामा द्यायला तयार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे... त्यानी मला थेट सांगावं. हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे."
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर आता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. या दरम्यान ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.