Police Transferred : पोलिसांच्या बदल्यांबाबत गृहखात्याचा अजब कारभार, पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना 12 तासांतच स्थगिती
Maharashtra Police Transferred : पोलिसांच्या बदल्यांबाबत गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे. पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना 12 तासांतच स्थगिती देण्यात आली आहे.
Maharashtra Police Transferred : महाराष्ट्र पोलीस दलात कालच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. मात्र, पत्रक काढून 12 तास उलटत नाही तोच 5 अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
राज्याच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक काढून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत माहिती देण्यात आली होती. बुधवारी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. परंतु, अवघ्या 12 तासांतच या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. याच आदेशाला गृहविभागानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांमधील गृहविभागाचा अजब कारभार समोर आला आहे. गृहविभागाच्या या कारभाराची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.
बुधवारी गृह विभागाकडून परिपत्रक काढून राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली होती. यात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश होता. त्यांच्या जागी नाशिमध्ये जयंत नाईकनवरे कारभार सांभाळणार होते. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही बदली झाली होती. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली होती. बीडचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांची पुण्यात बदली करण्यात आली होती. तसंच पुण्यातील मावळ गोळीबार प्रकरणामुळे वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या संदीप कर्णिक यांचं पुण्यात पुनरागमन झालं होतं. पुण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून त्यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला होता. इकडे मिलींद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आली होती. भारंबे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार होते.
दरम्यान, जुलै 2020 साली अनिल देशमुख गृहमंत्री असताना मुंबईत दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्या तीन दिवसांच्या आतच रद्द करण्यात आल्या होत्या. जुन्या ठिकाणीच कर्तव्यावर जाण्याचे आदेश त्यावेळी पोलीस उपायुक्तांना देण्यात आले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :