Maharashtra Government formation : ते पुन्हा आले, पण उपमुख्यमंत्री म्हणून; मोदी, शहांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी
Maharashtra Government formation : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणारे देंवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत.
Maharashtra Government formation : एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणारे देंवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. आधी मुख्यमंत्री आणि नंतर इतर मंत्री अशी अनेक उदाहरणे राज्यात यापूर्वी होती. परंतु, मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस राज्यातील एकमेव नेते आहेत.
राज्यपालांना भेटल्यानंतर आज दुपारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. यावेळी आपण एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. परंतु, दुपारच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस असतील अशी माहिती दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आता नव्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यांतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री पद भुषवले. परंतु, 2019 मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटल्यामुळे त्यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा आपण पुन्हा येऊ असे देखील सांगितले. 2019 मध्येच त्यांनी पुन्हा अजित पवार यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु, त्यावेळी त्यांना फक्त 80 तास मुख्यमंत्री पदावर राहता आले.
अजित पवार यांनी पाठिंबा काढून घेतला आणि उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेससोबत आघाडी करत सरकार स्थापन केले. त्यामुळे 2019 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यातच 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकाच्या सत्तेला सुरूंग लावला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यासाठी भाजपच्या हालचाली देखील सुरू झाल्या. परंतु, आज अचानकच एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर करून देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच धक्का दिला.
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करताना आपण मंत्रिमंडळात सामिल होणार नसल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीस यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर अमित शाह यांना यात यश मिळाले. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर केले. ट्विट करून अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली. "देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रासाठी निष्ठा आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत, असे ट्विट अमित शाह यांनी केले.
1978 मध्ये महाराष्ट्रला पहिले उपमुख्यमंत्री लाभले होते. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहित पाटील, आर आर पाटील आणि अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. अजित पवार यांनी सर्वाधिक चार वेळा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.