(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रपूरच्या सारंग बोबडे फोर्ब्स'च्या यादीत झळकला, मेळघाट ते लंडन थक्क करणारा प्रवास
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चंद्रपूरच्या सारंग बोबडे या युवकाच्या कार्याची दखल फोर्ब्सनं घेतली आहे.
चंद्रपूर : जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने 'फोर्ब्ज इंडिया 30 अंडर 30' म्हणजे तीस वर्षांखालील 30 भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत चंद्रपूरच्या सारंग बोबडे या युवकाची आंतरराष्ट्रीय मासिक फोर्ब्सने दखल घेतली आहे. भारतात अतुलनीय कार्य करणाऱ्या 'तीस वर्षाखालील गेम चेंजर' मध्ये चंद्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी धडपडणार्या तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यवसायिक, डिझायनर, तसेच खेळाडूंचा 'फोर्ब्स इंडिया' यादीत मान मिळविला आहे.
अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरचा सारंग बोबडे हे त्रिकूट 2017 मध्ये एकत्र आले. या तिघांच्या परिश्रमातून डोनेटकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. या माध्यमातून 10 लाखाहून अधिक देणगीदारांकडून तब्बल 150 कोटींच्या देणग्या विविध भागात काम करणाऱ्या 1 हजार स्वयंसेवी संस्थांना पुरविण्याच्या अनोखा विक्रम या त्रिकुटाने केला आहे. याची दखल 'फोर्ब्स इंडिया' या मासिकाने जागतिक पातळीवर घेतली.
सारंगचे वडील कालिदास बोबडे हे चंद्रपूर तालुक्यातील पिंपरी येथील जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. तर आई य शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सारंगचे दहावीपर्यंत शिक्षण चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूल येथे पूर्ण झाले. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर अनिल कुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे हे त्रिकुट एकत्र आले त्यांनी डोनेटकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून अतुलनीय कामगिरी करून हा लौकिक मिळविला. सारंगच्या या यशाविषयी त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. लहानपणी बाबा आमटे यांच्यापासून समाजसेवेची सारंगने प्रेरणा घेतली आणि तरुण वयात चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी असतांना देखील त्याने समाजसेवेचा वसा जोपासला असं त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :