(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtara Rain : कोकणासह विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन; वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Maharashtara Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. सध्या मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
कोणत्या विभागात पडणार पाऊस
राज्याच्या अनेक भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसत आहे. तर काही भागात नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई, पुणे या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गसह कोल्हापूर, नाशिक आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात जोरजार पाऊस
मुंबईमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तसेच मुंबई उपनगरात देखील जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याला देखील पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं. तसेच लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. माणगावमधील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून निर्मला नदीला पूर आल्याने नदीने पात्र ओलांडून आजूबाजूची शेती पाण्याखाली गेली आहे.
मराठवाड्यातही पावसाची हजेरी
मराठवाड्यातही जोरदा पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर विभागातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तसेच हिंगोलीतील कयाधू नदीला या वर्षात पहिल्यांदाच पूर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: