Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
Majha Vision Majha Maharashtra : शरद पवार साहेबांनी सुप्रिया सुळे यांना सोडून दुसऱ्यांना संधी दिली. पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा आहे, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.
मुंबई : पुत्रीप्रेम तर आम्हाला अनुभवायला मिळाले नाही. कारण पुत्री खासदार असताना त्यांना कधी मंत्री केले नाही. त्यांच्या तीन टर्म खासदारकीच्या झाल्या. जेव्हा संधी होती तेव्हा शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना सोडून दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे पुत्रीप्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच नाही. आमच्या मंत्रिमंडळात आम्ही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना काम करताना पाहिले आहे. आदित्य मंत्री म्हणून काम करताना उद्धव ठाकरे हे कलेक्टिव्ह डिसिजन घ्यायचे. त्यावेळी आदित्य ठाकरे हे चर्चेत आणि निर्णयात कधीच सहभागी नसायचे. त्यामुळे पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा आहे, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दिले. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये कोणताही गोंधळ नाही. भारतातली महागाई वाढली आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. लोकांनी आता पक्क ठरवलंय की दिल्लीचे सरकार पडायचेच आहे, असे त्यांनी म्हटले.
मलाही ऑफर देण्याचा प्रयत्न झाला
तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. तुम्हाला भीती नाही वाटली का? तुम्हाला समोर जावेस वाटले नाही का? अशी विचारणा केली असता जयंत पाटील म्हणाले की, मलाही ऑफर देण्याचा प्रयत्न झाला होता. तो पर्यंत एकदा झाला. पूर्ण दिवस मी तिथे जाऊन आले. भीती वाटो अगर न वाटो, पक्ष बदलण्याइतकी काही मोठी भीती नाही. जे त्या पक्षात गेले त्यांना जास्त भीती दाखवली गेली का? यावर जयंत पाटील म्हणाले की, मला माहिती नाही. कदाचित असण्याचा संभव आहे. मोदी साहेबांची घोषणा एकदा झाली आणि 70००0 कोटींचा आकडा त्यांनी सांगितल्यावर सगळेच गेले. त्यामुळे परिणाम झालेला दिसतोच आहे.
पक्ष कशामुळे फुटला हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत
राष्ट्रवादीत फूट पडेल याचा विचार केला होता का? यावर जयंत पाटील म्हणाले की, असे कधीच वाटले नाही. राष्ट्रवादी एक कुटुंब म्हणून पवार साहेबांनी सगळ्यांना जपले. सगळ्यांच्या उणीवा झाकून ठेवण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी नेहमी केला. सगळ्यांना प्रोत्साहन देऊन नवीन नेते करण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला. पण शेवटी आमचा पक्ष फुटला. पक्ष कशामुळे फुटला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे.
अजितदादांची राजकीय महत्वाकांक्षेची प्रगती थांबली
अजितदादांची राजकीय महत्वाकांक्षा आणि अध्यक्षपदावरून त्यांच्यातील आणि तुमच्यातील सुप्त लढाई कारणीभूत ठरली का? असे विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, अजितदादांची तिकडे जाऊन प्रगती झाली नाही. त्यांची प्रतिमा खराब होणार आहे हे त्यांना माहीत असावे. तरी देखील त्यांना असे पाऊल उचलावे लागले. माझ्या आणि त्यांच्यात सुप्त लढाई वगेरे काही नव्हती. मुंबईतील मेळाव्यात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा प्रदर्शित केली होती. ते आणखी पाच-सात दिवस थांबले असते तर त्यांची इच्छा पवार साहेब पूर्ण करणारच होते.
पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा
मोदी शाह महाराष्ट्रात आले की सांगतात, पुत्रप्रेम आणि पुत्री प्रेम यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. यावर जयंत पाटील म्हणाले की, पुत्रीप्रेम तर आम्हाला अजित अनुभवायला मिळाले नाही. कारण पुत्री खासदार असताना त्यांना कधी मंत्री केले नाही. तिला आधी मंत्री केले असते तर हे प्रसंग टळले असते. त्यांच्या तीन टर्म खासदारकीच्या झाल्या. जेव्हा संधी होती तेव्हा पवार साहेबांनी दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे पुत्रीप्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच नाही. आमच्या मंत्रिमंडळात आम्ही आदित्य ठाकरे यांना पाहिले. आदित्य मंत्री म्हणून काम करताना उद्धव ठाकरे हे कलेक्टिव्ह डिसिजन घ्यायचे. त्यावेळी आदित्य ठाकरे हे चर्चेत आणि निर्णयात कधीच सहभागी नसायचे. त्यामुळे पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा आहे.
सांगलीत भाजपचा पराभव होणार
सांगलीतील महाविकास आघाडीच्या तिढ्यावर खलनायक म्हणून तुमच्यावर आरोप करण्यात आले. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, आरोप कोणी केला. आरोप करणाऱ्याला त्याच्या भागात किंमत नाही. अशांवर मी का उत्तर देऊ? आघाडीचा निर्णय झाला की, माझा आघाडीच्या उमेदवाराशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी आहे. काही प्रश्न तिथे तयार झाले होते. 48 मतदारसंघापैकी एका मतदारसंघात एखादी घटना घडली. तर आमच्यात एकवाक्यता नाही, असा निष्कर्ष काढण्याची आवश्यकता नाही. सांगलीत भाजपचा पराभव होणार आहे.
बारामतीत 100 टक्के महाविकास आघाडीचा विजय
बारामती असो की सांगली असो हे प्रतिष्ठेचे का केले जात आहे. असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, कुणी केली प्रतिष्ठेची? प्रतिष्ठा दुसर्यांची पणाला लागली आहे. कारण सुप्रिया ताई या 100 टक्के निवडणूक येणार आहेत. त्यामुळे यात प्रतिष्ठा नाहीच.
निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला
पूर्वीचे राजकारण आणि आताचे राजकारण यात काय फरक पडला? यावर जयंत पाटील म्हणाले की, फरक फार पडलाय. ज्यावेळी लोकांना पराभव दिसतो त्यावेळी लोकं खर्च वाढवतात. निवडणूक आयोगाने डोळे बंद करून घेतले आहेत. निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला. आमच्या जागा पडण्यासाठी किती खर्च करण्यात आला, असे त्यांनी यावेळी म्हटले.
महाविकास आघाडी राज्याला स्थिर सरकार देणार
येत्या काळात स्थिर सरकार कोण देणार? यावर जयंत पाटील म्हणाले की, स्थिर सरकार महाविकास आघाडीच देऊ शकते हे आम्ही अडीच वर्षात दाखवून दिले आहे. आता चुकीच्या मार्गाने तुम्ही काही आमदार फोडले आणि आमचे सरकार पडले. त्यामुळे त्या आमदारांना विधानसभेत आणि लोकसभेत जनताच शिक्षा देणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुन्हा येणारे सरकार हे अधिक भक्कम आणि स्थिर असेल. महाविकास आघाडीत अनुभवी नेते आहेत आणि अतिशय भक्कमपणाने आम्ही महाविकास आघाडी पुढे नेऊ शकू असा आम्हाला विश्वास आहे.
राष्टवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही
शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरणावर केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले की, इंडिया आघाडीत अनेक छोटे छोटे पक्ष आहेत. काही ठिकाणी एक खासदार आहेत. तर काही ठिकाणी दोन खासदार आहेत. या पक्षांना जर मोठ्या पक्षात विलीन व्हायचं असेल तर पर्याय खुला आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
आणखी वाचा