(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सोबत सभा घेतली, पण भुजबळांची भूमिका मान्य नाही'; विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य
Vijay Wadettiwar : भुजबळ यांचा पक्ष वेगळा असून, त्यांची भूमिका वेगळी आहे, आणि त्यांचे विचार देखील वेगळे असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.
नांदेड : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भूमिका वेगळी असून, माझी भूमिका वेगळी आहे. त्यामुळे, त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन नाही, असे थेट वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले आहे. तसेच, इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी आपली भूमिका असले पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी भुजबळ यांना लगावला आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना वडेट्टीवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी सभा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या सभेत मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती महत्वाची समजली जात आहे. मात्र, भुजबळ यांच्या भूमिकेला आपले समर्थन नसल्याचे म्हणत, वडेट्टीवारांनी मोठं वक्तव्य केले आहे. तसेच, भुजबळ यांचा पक्ष आणि विचार वेगळे असून, आपली भूमिका वेगळी असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?
भुजबळ यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांना आपले समर्थन आहे का? या प्रश्नाचे उत्तर देतांना वडेट्टीवार म्हणाले की, “माझं कोणाच्याही भूमिकेला समर्थन नाही. माझी स्वतः ची आणि माझ्या पक्षाची भूमिका घेऊन मी समोर जाणार आहे. त्यामुळे, भुजबळांच्या भूमिकेला मी कसे समर्थन देणार? असे वडेट्टीवार म्हणाले. तर, भुजबळ यांचा पक्ष वेगळा असून, त्यांची भूमिका वेगळी आहे, आणि त्यांचे विचार देखील वेगळे आहेत. मी अनेक वर्षांपासून ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. ओबीसी यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, इतरांना कोणालाही त्यापासून दुःख होऊ नयेत आणि इतरांच्या कोणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही अशी आमची भूमिका असल्याचे," वडेट्टीवार म्हणाले आहेत.
आम्हाला देखील भूमिका मांडण्याचा अधिकार
तसेच यावेळी जरांगे यांच्या आंदोलनावर देखील वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे ओबीसीच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये. तसेच, नियमात बसवून जर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास, त्याला आमचा विरोध नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
वर्ल्डकपमध्ये भारत जिंकणार
सगळ्या देशात सध्या राजकीय भारताचं माहोल आहे, आणि क्रिकेटमध्ये देखील भारताचंच मोहोल आहे. त्यामुळे शंभर टक्के भारत मॅच जिंकणार आहे. ज्या पद्धतीने भारताचा संघ खेळत आहे, बॅटिंग साईड खूप मजबूत आहे, बॉलिंग साईड देखील तेवढीच मजबूत आहे. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप भारतच जिंकणार असल्याची आम्हाला अपेक्षा आहे. तर, प्रचंड रणाने हा सामना जिंकून भारताचा संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: