(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांचे संजय राऊतांना खुले आव्हान; म्हणले, हिंमत असेल तर....
Nagpur : संजय राऊत यांनी 'सामना' मधील 'रोखठोक' सदरामध्ये भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील संजय राऊतांना प्रत्युत्तर देत टीकास्त्र डागले आहे.
Nagpur News नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Loksabha) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला आहे. राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामध्ये नितीन गडकरींवरून मोदी शाह आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांच्या (Sanjay Raut) या खळबळजनक आरोपानंतर राज्याचे राजकारण तापले असून आता भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संजय राऊतांना थेट आव्हान देत निशाणा साधला आहे.
गटातटाचं राजकारण करणाऱ्यांना परिवार काय कळणार?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट करत संजय राऊतांवर टीकास्त्र डागले आहे. यावेळी ते म्हणाले की, उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत. पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर एक परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? असा खोचक सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरुन केला आहे.
संजय राऊतांमध्ये जर खरंच हिंमत असेल तर....
आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार, नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर 2019 मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. संजय राऊतांमध्ये जर खरंच हिंमत असेल तर एक ‘रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या! अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना थेट आव्हान देत निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.
जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे 'योगी को बचाना है, तो मोदी को जाना है' हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल.
इतर महत्वाच्या बातम्या