(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrashekhar Bawankule : मतं मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये; बावनकुळेंची नाना पटोलेंवर खोचक टीका
Chandrashekhar Bawankule On Nana Patole : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी ट्वीट करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
Chandrashekhar Bawankule On Nana Patole : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांच्याबद्दल नाना पटोलेंनी (Nana Patole) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मतं मिळविण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये आणि नाना पटोलेंनी घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नये असे म्हणत बावनकुळेंनी नाना प्तीले यांचा समाचार घेतला आहे. 'अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, मात्र निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते.
बावनकुळेंनी यांनी ट्वीट नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय जी धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.
नाना, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नका. कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीनं वागू नका, असे बावनकुळे म्हणाले.
नाना पटोले,
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 5, 2024
आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार श्री. संजय जी धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला… pic.twitter.com/tQEYuq6Nhq
नेमकं काय म्हणाले होते नाना पटोले....
2014 ते 2017 च्या काळात मी खासदार होतो. त्यावेळी नोटबंदी आणि जीएसटीची घोषणा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाला त्यावेळी मी स्वतः विरोध केला होता. मी खासदार असतांना त्यावेळी अकोल्याचे खासदार देखील होते. पण आता ते व्हेंटिलेटरवर असून, व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. मात्र, निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटरवर काढतील, असे नाना पटोले म्हणाले. विशेष म्हणजे पुढे बोलतांना संजय धोत्रे हे माझे मित्र असल्याचे सांगत नाना पटोले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मी मॅच फिक्सिंग करणाऱ्यांमधला नाही
अकोला लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलतांना नाना पटोले म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांनी माझ्यावर जे भाजपशी संबंधित असल्याचे आरोप केले, मी आज सांगू इच्छितो की मी मॅच फिक्सिंग करणाऱ्यांमधला नाही. मी पण वंचित आहे, शेतकरीपुत्र आहे. महाराष्ट्राच्या राजकाणात इतर पक्षातील नेते मित्र असतातच, पण मैत्री वेगळी आणि विचारधारा वेगळी, अकोला भूमी ही महाराष्ट्राच्या राजकारणात उलटापालथीच केंद्र बनली आहे. आपणास हे केंद्र उध्वस्त करायचे असल्याचे नाना पटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :