Video : माझं वय काय, तुझं वय काय?; चंपा म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंना चंद्रकांत पाटलांनी चांगलंच सुनावलं
चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीतील आमदार यशोमती ठाकूर यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नव्या नेत्यांनी संस्कृती वेगळीच सुरू केल्याचं म्हटलं.
मुंबई : नव्याने खासदार झालेल्या काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा उल्लेख चंपा असा केला होता. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांचा दाखल देताना, त्यांनी चक्क चंपा असे म्हटल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. खासदार प्रणिती शिंदेंच्या या वक्तव्यावरुन सोलापूरचे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. वडिलांच्या वयाच्या मंत्र्यांचा उल्लेख तुम्ही ज्या पद्धतीने करता त्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, असा पलटवार भाजप (BJP) प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला होता. आता, स्वत: चंद्रकांत पाटील यांनी, चंपा वक्तव्यावरुन प्रणिती शिंदेंना चांगलंच सुनावलं आहे. माझं वय काय, तुझं वय काय, असा सवाल उपस्थित करत अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा दाखलाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीतील आमदार यशोमती ठाकूर यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नव्या नेत्यांनी संस्कृती वेगळीच सुरू केल्याचं म्हटलं. ''काँग्रेस म्हणजे संस्कार, संस्कृती, राजकीय एथिक्स पाळणारा पक्ष असं मी समजत होतो. कारण, मी पृथ्वीराज चव्हाण यांना पाहतो, बाळासाहेब थोरात यांना पाहतो, विखे पाटील यांना पाहतो, स्वर्गीय एकनाथ गायकवाड यांनाही आम्ही पाहिलं आहे. नम्रता आणि संस्कार त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसून येते. पण, नव्या काँग्रेसचं रूप वेगळंच दिसतंय असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि योशोमती ठाकूर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी, खासदार प्रणिती शिंदे यांनी, चंद्रकांत पाटील यांचा, चंपा असा उल्लेख केला होता. त्यावरूनही, मंत्री पाटील यांनी सुनावलं. माझं वय काय, तुझं वय काय.. असा सवाल प्रणिती शिंदेंना केला.
व्हिडिओ पाहा - https://youtube.com/shorts/JxyVEhZnkCI?feature=shared
माझं वय काय, तुझं वय काय?, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही, मी म्हणायला गेलो तर केवढ्यात पडेल, असेही पाटील यांनी म्हटले. पालकमंत्री म्हणून मी सोलापूरला बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी, आढावा बैठकीत खासदार प्रणिती शिंदे आल्या, मला का बोलावलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, ही आढावा बैठक आहे कोणालाही बोलावलं नाही, आमचे आमदार भेटायला आले ते बैठकीत बसले, तुम्हीही बसा असं मी त्यांना सांगितलं. त्यानुसार, प्रणिती शिंदे बैठकीला बसल्या, तिथं त्यांनी काही सूचनाही केल्या. त्यानंतर, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गेल्या आणि तिथं माझा उल्लेख करताना, चंपा असं म्हटल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच, प्रणिती शिंदे यांच्याप्रमाणेच यशोमती ठाकूरही आहेत, त्या कधीच नॉर्मल बोलत नाही, असा टोला पाटील यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे
प्रणिती शिंदे सोलापूरमधील एका ठिकाणी कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्या. यावेळी कारण देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते. मला इथे यायला उशीर झाला. 10 वाजताची वेळ होती, पण मला यायला दोन वाजले. कारण मी इथंपर्यंत आले होते, पण आपले पालकमंत्री 'चंपा' असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, या वक्तव्यावरून भाजपकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
भाजप नेत्यांचा पलटवार
प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' उल्लेख केल्याच्या वक्तव्यावर भाजपची सडकून टीका करण्यात आली. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले, वडिलांच्या वयाच्या मंत्र्यांचा उल्लेख तुम्ही ज्या पद्धतीने करता त्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. नेहमीच संस्काराची भाषा बोलणाऱ्या प्रणिती शिंदे तुम्हाला कशाची मस्ती आहे. तुम्ही अद्याप संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतलेली नाही आणि एकेरी भाषेत उल्लेख करता. प्रणिती शिंदे हे बोलताना तुम्हाला थोडी लाज वाटायला हवी होती. एवढी टवाळखोरी जर तुमच्या बोलण्यात असेल तर सोलापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.