(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा महासंघाची बैठक संपन्न; जरांगेंना पाठिंबा, फडणवीसांचं कौतुक, भुजबळांवर टीका, मराठा नेत्यांवर हल्लाबोल
आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवा, ही आमची पूर्वीपासूनची मागणी असून पटेल, जाट, कर्मी, वानियार यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे
नागपूर : अखिल भारतीय मराठा महासंघाला पुढच्या वर्षी 125 वर्षे पूर्ण होत असताना आज मराठा महासंघाच्या (Maratha Mahasangh) पदाधिकाऱ्यांची एक बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीनंतर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना आपला पाठिंबा असल्याचं जगताप यांनी म्हटलं. तर, ब्राह्मण नेत्यांकडूनच मराठा समाजाला भरपूर मिळाले, मराठा नेत्यांकडून अपेक्षाभंग झाल्याचंही त्यांनी म्हटलं. मराठा आरक्षण, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विजय वडेट्टीवार, मनोज जरांगे, मराठा नेते आणि देवेंद्र फडणवीस यांसह विविध मुद्द्यांवर जगताप यांनी भाष्य केलं.
आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवा, ही आमची पूर्वीपासूनची मागणी असून पटेल, जाट, कर्मी, वानियार यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. देशातील नऊ राज्यांत आरक्षणाची मागणी आहे. समाज वंचित असून मर्यादा वाढवली तर सर्वांचे प्रश्न सुटतील. मराठा हे मोठे भाऊ, ज्या लहान भावाला चुकीने का होईना, ताटात काही दिले ते परत घेण्याचे आमच्या ध्येय धोरणात नाही. म्हणून आमची मागणी मर्यादा वाढवणे ही आहे. आम्हाला फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिले आहे. म्हणून आम्ही आमची जी काही खारीची ताकद होती ती भाजपच्या मागे लावली, असे जगताप यांनी म्हटले.
जरांगेंना पाठिंबा, पण दिल्लीतच प्रश्न सुटेल
मनोज जरांगे यांना आमचा शंभर टक्के आमचा जरांगे पाठिंबा आहे. ते जेव्हा जेव्हा मुंबईला येतात तेव्हा माझ्या कार्यालयात त्यांचा पाहुणचार ठरलेला असतो. दीडशे दोनशे कार्यकर्ते येतात, भेटी होतात. माझे म्हणणे आहे की, 50 टक्क्यांची मर्यादा सुटली की सर्वांचे प्रश्न सुटतील. माझे जरांगे भाऊंना, भुजबळांना आणि हाके बसलेत त्यांना देखील म्हणणे आहे की अरे इथे काय रडता? जो प्रश्न इथे सुटूच शकत नाही. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहात तुम्ही. राज्य शासनाच्या हातात काही नाही. भुजबळ, हाके, जरांगे आणि मी आणि सगळे राजकीय पक्षांचे नेते म्हणजे शिंदे, अजित दादा सगळ्यांनी मिळून पंतप्रधानांना साकडे घाला. फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे. आता अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनात एक ठराव पारित करायचा आहे, तो राष्ट्रपतींकडे पाठवायचा आहे, राष्ट्रपतींकडून आला की अध्यादेश काढायचा आहे. मर्यादा पन्नास ऐवजी 75 टक्के वाढवली तर देशातल्या सगळ्या वंचितांना आरक्षण मिळेल. पण काही स्वार्थी राजकारण्यांना तो नको आहे, म्हणून आमच्यात भांडणे लावायला कारण चाललं आहे. पण आम्ही भडकणार नाही, असे जगताप यांनी म्हटले.
वडेट्टीवारांची हकालपट्टी करा
काल वडेट्टीवारांनी एवढे अश्रू ढाळले. मात्र, मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच वर्षामध्ये 200 मयत झाले आहेत, त्यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा हरामखोर कोणी ओबीसीवाला अश्रू ढाळत आला नाही. आठ दिवस झाले हाके उपोषणाला बसले आहेत, तर डोळ्यात अत्तर टाकून आला होता की काय, असा प्रश्न मला त्याला विचारायचा आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला सांगायचे आहे, की याची ताबडतोब हकालपट्टी करा नाही तर पुढच्या निवडणुकीत समस्त मराठा समाज काँग्रेसच्या विरोधात मतदान करेल, असा इशाराही जगताप यांनी दिली.
तेव्हा भुजबळ कुठे होते?
छगन भुजबळांबद्दल द्वेष वाटण्याचे कारण शिवसेनेचा बॅनर होता, त्याखाली नव्वद टक्के मराठा होते. त्या मराठ्यांच्या विरोधात ते बोलताहेत म्हणून हा राग आहे, वैयक्तिक काही नाही. त्यांना मोठे करण्यासाठी कित्येकांनी अंगावर केसेस घेतल्या आहेत. ते फेटा बांधून बेळगावला जायचे की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, पण तीनशे मराठे अडकून पडले होते तेव्हा भुजबळ कुठे गेले होते? गेल्या पन्नास वर्षातला या राजकारणातला मी साक्षीदार आहे, असे म्हणत भुजबळांनाही लक्ष्य केले.
मुस्लिम आरक्षण हा गंभीर विषय
मुस्लिम आरक्षण हा गंभीर विषय आहे. कुणाला मुस्लिम हवेत, कुणाला नकोत, मला त्यात जायचे नाही. पण बाबासाहेबांच्या घटनेत सर्वांना समान हक्क दिला आहे तर त्यांना द्यायला अडचण काय, तो सर्वांना मिळावा. या देशात दोनच शासक जमाती झाल्या. एक मुस्लिम आणि एक मराठा. तिथे तर बापाला कापून राजे झाले. आपल्याकडे तसे नाही, आपल्याकडे संस्कार होते. घटनेप्रमाणे त्यांना जर मिळत असेल तर घटनेतले कायदे मुसलमान समाजाला लागू करा. नसतील मानायचे तर जा कुठेही. (मध्ये त्यांनी शरीयतचा उल्लेख केला) तुला अधिकार देतो पण तुला घटनेप्रमाणे वागावे लागेल.
मराठा नेत्यांवर हल्लाबोल
माझा विश्वास आहे. जे सगळे मराठे नेते झाले आहेत, मग शरद पवार, अशोक चव्हाण, विलासराव म्हणा किंवा मागचे गेले ते सर्व... त्यांनी मराठा समाजाला काही दिले नाही. जे दिले ब्राम्हणांनीच दिले. मनोहर जोशींनी महामंडळ दिलं.. आरक्षण फडणविसानी दिलं, तो टिकलं नाही, पण ब्राम्हणानीच दिलं ना.. साडे चार हजार लोकांचे भले झाले.. त्या दोन वर्षात IAS , IPS, MPSC मध्ये गेले ना त्या कालावधीत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, आम्ही त्या संस्करातले आहोत. दरम्यान, आता आम्हाला मुंबईत ते (फडणवीस) भेटणार आहेत. त्यांनी जर आमचे काम केले तर आम्ही भाजपच्या पाठीशी, नाही तर आम्ही मोकळे, असेही बैठकीत सांगण्यात आले.