Bajarang Sonwane : सांगा बजरंग बप्पाचे चुकले काय? बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवर सोनवणे समर्थक नाराज
दोन दिवसापूर्वीच राजेश्वर चव्हाण यांची बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीवर बजरंग सोनवणे यांचे समर्थक नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.
Bajarang Sonwane : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या जागी दोन दिवसापूर्वीच राजेश्वर चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र, या निवडीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि बजरंग सोनवणे यांचे समर्थक नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. बजरंग सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर 'बजरंग बप्पा चे चुकले काय?' असे विचारणारे पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
कोण आहेत बजरंग सोनवणे
- शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला.
- बजरंग सोनवणे हे सध्या बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
- येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
- केज विधानसभा मतदार सघात बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक वेगळा गट आहे. ..
- बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते.
- हर्षदा सोनवणे यांचा पराभव लागला जिव्हारी..
बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉक्टर हर्षदा सोनवणे यांचा नुकत्याच झालेल्या केज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. हर्षदा यांना पॉलिटिकल करिअरच्या सुरुवातीलाच पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच बजरंग सोनवणे समर्थक नाराज असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. हर्षदा सोनवणे यांचा पराभव बजरंग सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. पण केज नगरपंचायत निवडणुकीपासून बजरंग सोनवणे हेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सार्वजनिक कार्यक्रमापासून अलिप्त असल्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळाले.
बीड जिल्हा अध्यक्षपदावरून बजरंग सोनवणे यांच्या जागी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. खरतर पुढच्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत. या निवडणुका बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाव्यात, अशी सोनवणे समर्थकांची इच्छा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात बजरंग सोनवणे यांनी पक्षासाठी केलेल्या कामाच्या योगदानाची आठवण कार्यकर्ते सोशल मीडियातून करुन देत आहेत.
नेमकं काय म्हटलंय व्हायरल पोस्टरमध्ये ?
- सर्वात यशस्वी कारकीर्द ठरलेल्या जिल्हाध्यक्षांचे नेमके काय चुकले?
- आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर आष्टी तालुक्यात जाऊन फक्त 13 कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. पक्ष वाढवला अन् आज तिथे पक्षाचा आमदार आहे. पडत्या काळात पक्ष संघटन मजूबत केले, हेच तुमचे चुकले.
- पक्षाचे जिल्हास्तरावर मोर्चे आयोजित केले. पक्षाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन केले. स्वखर्चाने पक्षकार्य केले, हेच तुमचे चुकले.
- देशातील सर्वात मोठी निवडणूक लढवून सव्वा पाच लाख मते घेतली. त्यातून तयार झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा विधानसभा निवडणुकीत पक्षाला झाला. बीड जिल्ह्यात पक्षाचे 4 आमदार निवडून आले. मोठ्या आव्हानांना आपण सहज सामोरे जातात, हेच तुमचे चुकले.
- अडीच वर्षे विरोधी पक्षाकडे असलेली जिल्हा परिषद आपण राष्ट्रवादी पक्षाच्या हातात आणून दिली. पक्षासाठी अहोरात्र झटलात, हेच तुमचे चुकले.
- प्रस्थापितांच्या घरी जन्म न घेता, गरीबाच्या घरी जन्म घेतलात, हेच तुमचे चुकले.
- 4 वर्षे 8 महिने असा सर्वात अधिक काळ जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आपण पदाला न्याय दिला. पण पक्षाने तुम्हाला दिले काय?
- आम्हाला विश्वास आहे की तुम्ही लाथ मारील तिथे पाणी काढणारच.
- सांगा बजरंग बप्पाचे चुकले काय?
असा आशय लिहलेली पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरला होताना दिसत आहेत.