(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साहित्यिकांच्या मेळ्यासाठी उदगीर नगरी सज्ज, ग्रंथदिंडी प्रमुख आकर्षण, तयारी अंतिम टप्प्यात
Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : ऐतिहासिक उदगीर शहरात अवघ्या मराठी मनाचे वैश्विक सांस्कृतिक संचित असणाऱ्या या साहित्य संमेलनाचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी होणार आहे. त्यासाठी उदगीर सज्ज झालं आहे.
Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 22 ते 24 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यिक, लेखक, रसिकांच्या स्वागतासाठी उदगीरनगरी सज्ज झाली आहे. 155 लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन यावेळी होणार आहे. 216 बुकस्टॉल लागणार आहेत. तक 55 इतर स्टॉलही असणार आहेत.
ऐतिहासिक उदगीर शहरात अवघ्या मराठी मनाचे वैश्विक सांस्कृतिक संचित असणाऱ्या या साहित्य संमेलनाचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी होणार आहे. नवरंगांनी सजलेल्या ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनास सुरुवात होणार आहे. अवघी उदगीर नगरी सजली आहे.
संमेलनस्थळी 216 बुक स्टॉल, तर 55 इतर स्टॉल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनात 139 प्रकाशकांनी नोंद केली आहे. तर 216 बुक स्टॉलची नोंद झाली आहे. शासनाच्या प्रकाशनाचे पाच बुक स्टॉल नोंद करण्यात आले आहेत. याशिवाय साहित्यनगरीमध्ये इतर 55 स्टॉल्सची नोंद झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तसेच 155 लेखकांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. संमेलनस्थळी त्यांनी नाव नोंदणी केली आहे. यात कथासंग्रह, कविता, नाटक, ललित कथा यांसह इतर साहित्याच्या पुस्तकांचा समावेश आहे. नवोदित लेखक यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कायमच पुढाकार घेत आहोत. येणाऱ्या प्रत्येक लेखकांची नोंद घेत पुस्तक प्रकाशन केले जाईल, अशी माहिती रामचंद्र तिरुके यांनी दिली आहे.
तयारी पूर्णत्वास
साहित्य संमेलन ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. त्यास भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी असं नाव देण्यात आलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेली साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टण्यात आली आहे. साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी शहरातील मुख्य मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. साहित्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर आलं असून भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरीच्या प्रवेशद्वाराचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याचबरोबर साहित्य नगरीत सात व्यासपीठ तयार करण्यात येत आहेत. सर्व सभागृह उभारणी अंतिम टप्प्यात आहे.
ग्रंथदिंडी ठरणार प्रमुख आकर्षण, आबालवृद्धाचाही असणार सहभाग
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. या ग्रंथ दिंडोमध्ये सुमारे 80 शाळांचे विद्यार्थी आपले कलाविष्कार सादर करीत या ग्रंथदिंडीत सहभागी होणार आहेत. या ग्रंथदिंडीमध्ये विविध विषयांवरील चित्ररथ, 11 बुलेटस्वार महिला 120 स्कुटीस्वार महिला, 120 सायकल स्वार, तुळशीदारी महिला, कलशधारी महिला, 450 विद्यार्थ्यांचे नवरंग, घोडे पथक, बँड पथक, वारकरी भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, लेझीम पथक, ढोल पथक, कवायत, मयूर पिसारा, लातूर जिल्हा वैभव चित्ररथ, शिवराज्याभिषेक देखावा, पर्यावरण रथ देखावा, साहित्यातून घडलेला भारत चित्ररथ, विज्ञान चित्ररथ, स्त्रीभ्रूण हत्या आणि व्यसनमुक्ती चित्ररथ, नवीन शैक्षणिक धोरण सचित्र दर्शन चित्ररथ, स्वराज्य प्रतिज्ञा चित्ररथ, महापुरुषांची वेशभूषा, राजस्थानी वेशभूषा, कानडी वेशभूषा, मराठी वेशभूषा, बंगाली वेशभूषा, मारवाडी वेशभूषा, संत साहित्यिक वेशभूषा, महान स्त्री वेशभूषा, बंजारा वेशभूषा हे या ग्रंथदिंडीचे आकर्षण राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघून ग्रंथदिंडी संमेलनस्थळी पोहोचणार आहे.
या ग्रंथदिंडीत लोकसहभाग असावा. विद्यार्थांना मराठी भाषा, संस्कृतीची ओळख होणं आवश्यक आहे. यामुळे अनेक शाळा यात सहभागी करून घेतल्या आहेत. पर्यावरण ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे हा संदेश देण्यात येणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागरळकर यांनी दिली आहे.