Ajit Pawar : कोणाला मस्ती आल्यास ती जिरवण्याची ताकद आमच्याकडे; 'दादागिरी'च्या भाषेवर अजितदादांची टोलेबाजी!
महाविकास आघाडीतील मतभेद, राज्यातील सुरु असलेल्या घडामोडी या सर्वांवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं.
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज सकाळ माध्यम समूहाकडून प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी आपल्या शैलीमध्ये त्यांच्या भाषण शैलीवरून तसेच वक्तव्यावरून भाष्य केले. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोले लगावत मुलाखतीमध्ये चांगलीच रंग भरला. मुख्यमंत्र्यांनी एमपीएसी प्रश्नाला निवडणूक आयोगाचा संदर्भ, तसेच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर टोले लगावले.
कोणाला मस्ती आली असेल तर ती जिरवण्याची ताकद आमच्याकडे
अजित पवारांना दादागिरी या भाषेवरून विचारण्यात आले. अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी तो शब्दप्रयोग होतो. तर ते म्हणाले की, अशा प्रकारची भाषा वापरण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यासाठी त्यांनी पुरंदरमधील उदाहरण दिले. पुरंदरमध्ये विजय शिवतरे यांच्याकडून अत्यंत गलिच्छ पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती टीका सुरू होती. मात्र, ही राज्याची संस्कृती आहे का? अशी त्यांनी विचारणा करत पवार साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखं आहे. सुप्रियासुद्धा संसद गाजवत आहे. त्यामुळे महिलांकडे पाहून बोलताना कोणती भाषा असावी याचं तारतम्य बाळगले पाहिजे. कोणाला मस्ती आली असेल तर ती जिरवण्याची ताकद आमच्याकडे असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
महाविकास आघाडीतील समन्वय तसेच गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि त्यांच्यामध्ये झालेले मतभेद तसेच त्यांच्या भाषेवरून होत असलेली टीका या अनुषंगाने त्यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सत्तेत असताना दौरे काढणार होतो. याबद्दल आमच्यामध्ये म्हणजेच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, 2020 मध्ये मार्च पहिल्या आठवड्यामध्येच कोरोना संकट आल्याने ते होऊ शकले नाही. त्यानंतर काही कालावधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजारांना ग्रासल्याने परिस्थिती बिकट झाली. त्यानंतर सरकार कोसळल्याने आम्हाला तो समन्वय साधता आला नाही. मात्र, आता आम्ही गेल्या काही दिवसांपासून सभा घेत आहोत. त्यामधील एक सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. दुसरी सभा नागपूरमध्ये पार पडली. तर तिसरी सभा आता एक मे रोजी मुंबईमध्ये होत आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये ही तीन पक्षांचा समन्वय होत असताना अडचणी येत असतात. मात्र, वरिष्ठानी जी भूमिका घेतली आहे त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि अजितदादा यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या अनुषंगाने तुम्हाला चौकीदारी मान्य आहे का? विचारण्यात आले असता ते म्हणाले की या संदर्भात आमच्या पक्षाच्या अनुषंगाने ज्या काही बाबी असतील ते आमचे नेते मांडतील, आमचे प्रवक्ते भूमिका स्पष्ट करतील. इतरांनी बोलण्याची गरज नाही.
इतर महत्वाच्या बातम्या