नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोपीचा जबाब 'माझा'च्या हाती, गृहमंत्र्यांकडूनही गंभीर दखल
नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एबीपी माझानं केल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी अनिल चव्हाणके यांनं पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलेला जबाब माझाच्या हाती लागला आहे.
पुणे : नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एबीपी माझानं केल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी अनिल चव्हाणके यांनं पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलेला जबाब माझाच्या हाती लागला आहे. आरोग्य भरतीचा पेपर कोल्हापूरमधील राहुल पाटील यानं 24 ऑक्टोबरला व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचं चव्हाणके यानं जबाबात म्हटलंय. तर नाशिक पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या आणि पोलीस अकादमी चालवणाऱ्या रवींद्र दिघे यानं पिंपरी चिंचवड पोलीस आणि नायगावमधील पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना भरती करून देऊ असं म्हटलंय. त्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत.
दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर पेपरफुटीच्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश वळसे पाटील यांनी दिले आहेत.
मिलिट्री इंटेलिजन्सने सापळा लावून पकडून दिलेला सैन्यातील हवालदार अनिल चव्हाणके याने पिंपरी-चिंचवड पोलीसांना दिलेला हा जबाब आहे. यामधे चव्हाणके आरोग्य भरतीचा पेपर त्याला कोल्हापूरमधील राहूल पाटीलने 24 ऑक्टोबरला व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचे सांगितलं आहे. नाशिक पोलिस दलात कार्यरत रविंद्र दिघे नावाचा कॉन्स्टेबल जो स्वतःची पोलीस अॅकडमी देखील चालवतो. पिंपरी-चिंचवड आणि नायगाव पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आपण भरती करुन देऊ असे म्हणतोय.
अनिल चव्हणकेने पिंपरी-चिंचवड पोलीसांना जो जबाब दिला आहे त्यामध्ये आरोग्य विभागाचा पेपर त्याला 24 ऑक्टोबरला राहुल पाटील कोल्हापूर याने पाठवला होता. पिंपरी-चिंचवड पोलीसांनी राहुल पाटीलची चौकशी केली का? असा सवाल उपस्थित होत आहे.
रविंद्र दिघे या नाशिकमधे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने चव्हाणकेला 8 नोव्हेंबरला फोन करुन पिंपरी-चिंचवड आणि नायगाव पोलीस भरतीचे काम आपण करुन देऊ असे सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलीसांनी रविंद्र दिघेची चौकशी केली का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
प्रवीण पाटीलच्या सांगलीच्या घरातून सैन्य अधिकारी असल्याचे युनिफॉर्म मिळाले आहेत. यामध्ये काही युनिफॉर्म हे प्रवीण पाटीलच्या नेम प्लेटचे आहेत तर काही युनिफॉर्म हे सैन्यातील इतर जवानांच्या नेम प्लेटसह आहेत. ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे.