Ashadhi Wari 2022 : आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन, यंदा पंढरपुरात विक्रमी भाविक येण्याची शक्यता
आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन मिळणार आहे. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचं दर्शन मिळावं यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

Ashadhi Wari 2022 : आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचं दर्शन घडावं यासाठी आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. याबातची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. तसेच आज सकाळी 11 वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळं आता आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत, अशी प्रथा आहे.
पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय महानाट्यानंतर यंदा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. याबाबतची माहिती देखील मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यंदा आषाढी वारीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर समितीनं निमंत्रण दिलं होतं. मात्र गेल्या दोन दिवसात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा होणार आहे.
यंदा विक्रमी भाविक येण्याची शक्यता
आज सकाळी 11 वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला. आता आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत, अशी प्रथा आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळं देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढी यात्रा भरली नसल्यानं यंदा विक्रमी यात्रा भरण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे होणार दर्शन
आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. चोवीस तास दर्शनाला उभारुन देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारतीपर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते.त्यानंतर मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळं दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्यासाठी दर्शन बंद राहणार असून, उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र दर्शन घेता येणार आहे. आता आषाढी यात्राकाळात आजपासून मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे. यामुळं यात्रा काळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
