(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Mitkari : रोहित पवार आगलाव्या, दादांच्या खांद्यावर हात ठेवायची नरेश अरोराची हिंमत कशी होते? अमोल मिटकरी काय-काय म्हणाले?
Amol Mitkari On Naresh Arora : एकनाथ शिंदेंकडे तीन पीआर एजन्सी आहेत. पण त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची एकाचीही हिंमत झाली नाही असं अमोल मिटकरी म्हणाले.
अकोला : रोहित पवार हा खोटं बोलणारा आणि आगलाव्या आहे असा आरोप करत निकालाच्या दिवशी त्याने दादांची भेट घेतली नव्हती असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिलं. राम शिंदेंना काहीतरी गैरसमज झाला आहे, त्यांच्याविरोधातील कोणत्याही कटात अजितदादा सामील नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. तर राष्ट्रवादीचं यश हे फक्त अजितदादांच्या कष्टामुळे आहे असं सांगत नरेश आरोराने दादांच्या खांद्यावर हात ठेऊन त्याची पीआर एजन्सी प्रमोट केल्याचा आरोप मिटकरींनी केला.
रोहित पवार आगलाव्या
कर्जत जामखेडमधील पराभवाला अजित पवार जबाबदार आहेत असा आरोप राम शिंदे यांनी केला. त्यावर स्पष्टीकरण देताना अमोल मिटकरी म्हणाले की, राम शिंदेंचा गैरसमजल झाला आहे. अजितदादांचा दोनदा निरोप आलेला कर्जत जामखेडला जा म्हणून. पण वेळेच्या अभावी जाता आलं नाही. पण त्यावरून दादा कटात सामील होते असा आरोप बिनबुडाचा आहे. पाशा पटेलांनी कर्जत जामखेडमध्ये सभा घेऊन अश्लील हातवारे केले त्याचा परिणाम झाला असं आम्ही म्हणू शकतो. रोहित पवार विधानसभेच्या वेळी अजितदादांकडे मदतीसाठी अनेकदा गेले. पण दादांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
अजितदादांवर आरोप करायला लावले
रोहित पवारांनी अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, मेहबूब शेख, सक्षणा सलगर यांना हाताशी धरून अजितदादांवर आरोप केल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. शरद पवारांनाही त्याने दादांच्याविरोधात बोलायला लावल्याचा आरोप मिटकरींनी केला.
आपलं दुकान सुरू ठेवण्यासाठी नरेश आरोराचा प्रयत्न
अजित पवारांना मिळालेल्या यशामागे नरेश आरोरांच्या पीआर कंपनीचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, "हे सगळं खोटं आहे. डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी, ती काही फुकट काम करायला आली नव्हती. अशा प्रकारच्या तीन एजन्सी एकनाथ शिंदेंच्या सोबत होत्या. त्या कुठे दिसल्या का? त्यांच्या पक्षाला 51 जागा मिळाल्या. त्यावेळी कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची? तो दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आता भारतातील इतर ठिकाणच्या निवडणुका आहेत. आपलं दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीने स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न केला. विजयाचं श्रेय आपल्याकडे घेतलं."
शिंदेंकडे तीन पीआर एजन्सी, पण खांद्यावर हात ठेवायची हिंमत नाही
अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, "मी जबाबदारीने बोलतोय, आमच्या भावना दुखल्या त्याचं काय? पवार साहेबांच्या खांद्यावर हात ठेवायची कुणाची हिंमत झाली नाही. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो. त्याची पीआर कंपनी लाँच करण्यासाठी म्हणतो की हे आमचं यश आहे. मग 41 आमदार निवडून आले ते, त्यांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सोशल मीडिया हे काय झोपत होते का? ज्या पद्धतीने तीन पीआर एजन्सीमध्ये एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची हिंमत झाली नाही त्या पद्धतीने डिझाईन बॉक्स एजन्सी प्रमोट करण्याची हिंमत त्यांनी केली कशी? याचा तीव्र शब्दात निषेध करतो. अरोराराने यशाचं श्रेय घेण्याचं काही संबंध नाही. त्याला पक्षाने शो कॉज नोटीस पाठवली पाहिजे. अरोराचा काडीमात्र संबंध नाही."
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील
भारतीय जनता पक्षाकडे आता बहुमत आहे. त्यामुळे त्यांनाच मॅन ऑफ द मॅच मिळावे. काही माध्यमांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला दाखवला जातोय. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर सध्यातरी शिक्कामोर्तब केलं गेल्याची माहिती आहे. पण एक वर्षांसाठी का असेना अजितदादांना मुख्यमंत्रिपद मिळावं अशी आमची इच्छा आहे असं अमोल मिटकरी म्हणाले.