VIDEO : ठाकरेंच्या खासदाराला अमित शाहांचा फोन, वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् आपुलकीने विचारणा, किती वर्षांचे झालात?
Amit Shah Call To Nagesh Patil Ashtikar: अमित शाहांनी ठाकरेंच्या खासदाराला फोन केल्यानंतर आता त्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अमित शाहांच्या या शुभेच्छांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची रीघ लागली असताना दुसरीकडे ठाकरेंच्या एका खासदाराला केंद्रीय मंत्री अमित शाहांनी फोन केल्याचं समोर आलं. ठाकरेंचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना अमित शाहांनी फोन केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हा कितवा वाढदिवस साजरा करत आहात असं आपुलकीने विचारणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
Amit Shah Call To Shiv Sena MP Hingoli :नेमकं काय घडलं?
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रविवारी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्री अमित शाहांचा फोन आला. अमित शाहांनी नागेश पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हा कितवा वाढदिवस साजरा करत आहात असंही विचारलं. त्यावेळी आपण 54 वा वाढदिवस साजरा करत असल्याचं नागेश पाटील यांनी अमित शाहांना सांगितलं. तसेच शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
Nagesh Patil Ashtikar Birthday : ठाकरेंना शुभेच्छा नाहीत, पण त्यांच्या खासदारांना फोन
रविवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस होता. शिवसैनिकांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः राज ठाकरे उपस्थित राहिले होते. तसेच देशभरातील आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्याचवेळी केंद्रीय मंत्री अमित शाहांनी मात्र ठाकरेंना शुभेच्छा न देता त्यांच्या खासदाराला मात्र आठवणीने शुभेच्छा दिल्या. त्याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आल्याचं दिसून येतंय.
BJP Operation Lotus Maharashtra : भाजपचे ऑपरेशन लोटस पुन्हा सक्रिय?
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली आणि 31 खासदार निवडून आणले. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत गेले. त्याचवेळी केंद्रातील सरकार स्थिर करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा सुरू झाली.
ठाकरेंचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं तर कधी गिरीश महाजनांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा नागेश पाटील आष्टीकर यांना फोन आल्याने त्याची पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं दिसून येतंय.
नागेश पाटील आष्टीकर हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून निवडून आले. त्यांनी शिंदेंच्या बाबुराव कदम कोहळीकर यांचा लाखांच्या मतांनी पराभव केला. आता अमित शाहांनी नागेश पाटील आष्टीकरांना दिलेल्या शुभेच्छा या भविष्यातील राजकारणाची नांदी असल्याचं बोललं जातंय.























